किनवट तालुक्यात हमीभावाने 83 हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday, 31 March 2025

किनवट तालुक्यात हमीभावाने 83 हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी

किनवट, दि.30 (प्रतिनिधी) : ‘एनसीसीएफ’ (भारतीय राष्ट्रीय सहकारी उपभोक्ता संघ लिमिटेड) या केंद्रीय एजन्सीमार्फत यंदाच्या हंगामात किनवट तालुक्यातील चार हमीभाव खरेदी केंद्रांवर एकूण 5 हजार 636 शेतकऱ्यांकडून 83 हजार 850 क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली आहे.


किनवट तालुक्यात किमान हमीभावानुसार सोयाबीनची विक्रीपूर्व नोंदणी 15 ऑक्टोबर 2024 पासून सुरू होऊन ती 6 जानेवारी 2025 पर्यंत चालू होती. या काळात तालुक्यातील शेतकऱ्यांनी विक्रीपूर्व नोंदणी केली. 15 ऑक्टोबरपासून सोयाबीनची खरेदीही सुरू झाली. प्रारंभी शेतकऱ्यांनी विक्रीपूर्व नोंदणी तसेच खरेदीकडे फारशी ओढ दाखविली नाही. मात्र, हमीभाव 4 हजार 892 रुपये प्रति क्विंटल असताना, खुल्या बाजारात सोयाबीनचे दर बरेच घसरल्यामुळे शेतकऱ्यांचा कल हमीभाव नोंदणीकडे अधिक झुकला. परिणामी, खरेदी केंद्रांवर मोठी गर्दी दिसून आली. शासनाने खरेदीला मिळालेला प्रतिसाद पाहता, नोंदणी आणि खरेदीसाठी 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली होती.


सोयाबीन खरेदीची मुदत संपेपर्यंत  किनवट कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत 2 हजार 133 शेतकऱ्यांकडून 32 हजार 426 क्विंटल, गणेशपूर येथील ‘किनवट तालुका कृषीमाल प्रक्रिया सहकारी संस्था मर्या.’तर्फे 752 शेतकऱ्यांकडून 12 हजार 870 क्विंटल, ‘सारखणी फार्मा प्रोड्युसर कंपनी’तर्फे 1 हजार 351 शेतकऱ्यांकडून 15 हजार 556 क्विंटल तर कोपरा फाटा येथील ‘इंडेक्स फार्मर प्रोड्युसर कंपनी लि.’तर्फे 1 हजार 400 शेतकऱ्यांकडून 22 हजार 998 क्विंटल अशा एकूण 5 हजार 636 शेतकऱ्यांकडून 83 हजार 850 क्विंटल सोयाबीनची हमीभावाने खरेदी करण्यात आली.


गत खरीप हंगामात तालुक्यात 16 हजार 405 हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली होती. तालुक्यातील नऊ महसूल मंडळांमध्ये झालेल्या मुख्य पीक कापणी प्रयोग अहवालानुसार, प्रती हेक्टरी सरासरी 8 क्विंटल 62 किलो इतका कमी सोयाबीनचा उतारा नोंदवला गेला. एवढेच गृहित धरले तरी तालुक्यात एकूण 1 लाख 41 हजार 411 क्विंटल सोयाबीनचे उत्पादन झाल्याचा निष्कर्ष निघतो.  मात्र, त्यातील 83 हजार 850 क्विंटलच हमीभावाने खरेदी करण्यात आले. म्हणजेच उर्वरित  57 हजार 561 क्विंटल सोयाबीन खुल्या बाजारात विक्रीसाठी गेले असावे. कारण, इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या घरात सोयाबीन साठवले गेले असल्याची शक्यता कमी आहे.


याशिवाय, खासगी व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून नऊशे ते  हजार रुपये कमी दराने खरेदी केलेले सोयाबीन त्याच शेतकऱ्यांच्या नावावर हमीभावाने शासकीय खरेदी केंद्रांमध्ये विक्रीसाठी दाखल केल्याची शक्यता वर्तवली जात आहे ; तसेच अनेक व्यापारी हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीन खरेदी करून साठवणूक करतात आणि बाजारात दर वाढल्यानंतर ऑईलमील किंवा इतर तत्सम ठिकाणी तो माल जास्त दराने विकून शेतकऱ्यांपेक्षा कमी कष्टात व कमी वेळात जास्त नफा  कमावतात, हीच बाब शेतकऱ्यांसाठी दुर्देवी ठरते.

No comments:

Post a Comment

Pages