'श्वास मी सोडेन घेणे एकदाचा, रक्तात भीम माझ्या... बहुभाषिक कविसंमेलन संस्मरणीय; नागसेन फेस्टिव्हलचा जल्लोषात समारोप - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday, 31 March 2025

'श्वास मी सोडेन घेणे एकदाचा, रक्तात भीम माझ्या... बहुभाषिक कविसंमेलन संस्मरणीय; नागसेन फेस्टिव्हलचा जल्लोषात समारोप


छत्रपती संभाजीनगर : "श्वास मी सोडेन घेणे एकदाचा, रक्तात भीम माझ्या मी बंडखोर आहे." या आणि अशा अनेक विद्रोही कवितांनी उपस्थित श्रोत्यांच्या अंगावर अक्षरशः रोमांच उभे केले.

मिलिंद महाविद्यालयाच्या लुंबिनी उद्यानात रविवारची सायंकाळ सर्वांच्या कायम स्मरणात राहील. "या ज्ञान पाखरांनो, चला नागसेनवनाकडे", ही थीम घेऊन नागसेन  फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते. यंदाचा हा नववा फेस्टिव्हल आहे. या फेस्टिव्हलच्या समारोपीय समारंभात बहुभाषिक कविसंमेलन, स्टैंड अप कॉमेडी, आंबेडकरी रॅप, भीमगीत, संविधान पोवाडा, फ्लॅश मॉब, नृत्य सादरीकरण इ. तून नागरिकांचे प्रबोधन केले. समारोप समारंभामध्ये सर्वात दाद मिळाली ती डॉ. उत्तम अंभोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बहुभाषिक कविसंमेलनास.

गोरमाटी भाषेमुळे वैविध्य

डॉ. वीरा राठोड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना उद्देशून "ज्यांनी पेरले बीज रक्तात पेटण्याचे, सलाम त्यांना, ज्यांनी भरले धाडस खेटण्याचे, सलाम त्यांना " ही मराठीतून तर गोरबंजारा समाजात आंबेडकरी विचार पोहोचविण्यासाठी गोरमाटी भाषेत लिहिलेली "बाबासाहेब दिनोवजळो, चालो लक्रिरी वाटेने चालो" ही कविता सादर केली.

राहुल साळवे, ना. तु. पोधे, डॉ. सलीम मोहिउद्दीन, आकाश वानखेडे यांनी सादर केलेल्या कविताही दाद मिळवून गेल्या. विशेष म्हणजे, जगदीश भगत यांच्या सूत्रसंचालनाने हे कविसंमेलन अधिक बहरत गेले. तब्बल साडेचार तास चाललेल्या या कार्यक्रमात नागरिकांनी प्रचंड गर्दी केली.




गडचिरोलीचे रमेश बुरबुरे यांच्या "हड्डीस एकदाचा कुत्रा म्हणेल नाही, नेत्यासमान दुसरा कोणी हडेल नाही, आणि त्यांना हवा तसा तो वापर करावयाला, ही भारतीय जनता त्यांची रखेल नाही." या कवितेला प्रेक्षकांकडून प्रचंड दाद मिळाली.

सारनाथ आगळे यांच्या अहिराणी कवितेने हुकूमशाही, पुरुषी वृत्ती आंबेडकरी समतावादी विचारावर कविता सादर केली.

कल्याण येथील रॅपर माही हिने 'रेप इन इंडिया कबतक' या रॅप ने मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या विषय प्रश्न उपस्थित केले त्यातील "कब तक बेटी बचाओ सच में बंद होगा कब तक" या वाक्यावर उपस्थितांना विचार करायला भाग पाडले बलात्काराच्या घटनेनंतर होणाऱ्या आंदोलनवरही तिने 'कैंडल लेकर घूमेंगे कब तक' असा सवाल उपस्थित केला.

विपीन तातड याने 'जयभीम वाला पोट्टा' हा रॅप सादर करून बाबासाहेबांचे शिक्षण आणि कार्यावर प्रकाश टाकला तर प्रणाली सुरडकर हिने नृत्यातून वामनदादा कर्डक, त्यागमूर्ती रमाई चे जीवन चारित्र्य उलगडून दाखवले.

उत्कर्षा बोरीकर हिच्या बुद्ध भीम अभिवादनाने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले तर व्हायोलिन, सेक्सोफोन वरील संध्या जाधव, रवींद्र जाधव यांच्या सुरमयी सादरीकरणाने प्रेक्षकांची दाद मिळविली.

डॉ.सुनील तलवारे यांना नागसेन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर शिक्षक संघाचे अशोक बहिरव, डॉ. संजय पगारे, डॉ.मानव पगारे, साहित्यिक प्रकाश जंजाळ, ऍड.संदिप थोरात,बीड., बाळासाहेब थोरात,मुंबई.,ऍड बि. जी. बनसोडे, कवी गायक मुकुंद ओव्हाळ यांना मिलिंद सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

No comments:

Post a Comment

Pages