मुंबई :- राज्यातील खासगी शिकवणी वर्गांवर नियंत्रण आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी सरकार नवीन कायदा आणणार आहे. तसेच, शालेय शिक्षण सुधारण्यासाठी रोडमॅप आखणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधान परिषदेत दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य अमोल मिटकरी यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना ते बोलत होते. भुसे म्हणाले, केंद्र सरकारने खासगी शिकवणी वर्गावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यासाठी नियमावली करण्याचा प्रस्ताव आयुक्त पातळीवर
तयार करण्यात आला आहे. अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतरही खासगी शिकवणी वर्गांवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे शासनाने या विषयावर नियमन करण्याचे ठरवले आहे.
राज्यातील ग्रामीण आणि शहरी शाळांमध्ये भौतिक सुधारणा आणि शिक्षणाच्या गुणवत्ता विकासासाठी रोड मॅप तयार करण्यात आला आहे. या रोड मॅपनुसार प्रत्येक शाळेत स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये सर्व शाळांमध्ये डिजिटल शिक्षणाचा प्रसार, ई-लर्निंग सारख्या सुविधा असतील, असेही भुसे यांनी स्पष्ट केले.
No comments:
Post a Comment