छत्रपती संभाजीनगर : पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या आजी माजी विद्यार्थ्यांच्या वतीने महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त २८ ते ३० मार्च दरम्यान नागसेन फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. लुम्बिनी उद्यान, मिलिंद महाविद्यालय, नागसेनवन परिसर, छत्रपती संभाजीनगर येथे सायंकाळी ५ ते १० यावेळेत दररोज विविध कार्यक्रमाची मेजवानी असणार आहे. २८ मार्चला जगप्रसिद्ध छायाचित्रकार सुधारक ओलवे यांच्या हस्ते सायं ६ वाजता या फेस्टिव्हलचे उद्घाटन होईल. सिनेअभिनेते कैलास वाघमारे, चित्रकार शुभा गोखले यांची यावेळी विशेष उपस्थिती असणार आहे.
तसेच सुधारक ओलवे यांच्या छायाचित्र प्रदर्शनाचे तसेच आर्ट फेस्टिव्हलचे उदघाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येईल. आर्ट फेस्टिव्हल मध्ये महाराष्ट्रातील अनेक कलावंत यांचे शिल्प, चित्र, स्टोन आर्ट, वुडन आर्ट, मुक्त कला, कॅलिग्राफी या प्रकारातील कलाकृती ठेवण्यात येणार आहेत. संजीव सोनपिंपरे, नंदकुमार जोगदंड, विकास सरवदे , राज शेजवळ, पूजा कदम, संदेश सुरडकर, हर्षद खांड्रे, कैलास खाणजोडे, महेंद्र काहजेकर हे कलावंत विविध कलाकृतींचे थेट प्रात्यक्षिक सादर करणार आहेत. नृत्य प्रशिक्षक राज्यपाल गवई व संच हे स्वागतपर फ्लॅश मॉब चे सादरीकरण करतील. सांची आराक ही बुद्धवंदनेवर नृत्य सादर करेल. त्यानंतर 'लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी फुले आंबेडकरी चळवळीची प्रासंगिकता' विषयावर सेवानिवृत्त सहायक पोलिस महानिरीक्षक यशवंत वटकर यांचे व्याख्यान होईल. तर गीतकार साधना मेश्राम, वैद्यकीय सेवेतील अमोल कांबळे, सुलेखनकार अमित भोरकडे, अशोक सोनवणे, प्रसाद देठे, प्राचार्य तुकाराम शिवराम मगरे, प्रा. के. एन. बनसोडे यांना मिलिंद सन्मान पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येईल. तर 'सांगळा' ला चित्रपट श्रेणीतून तसेच 'पाखर' या लघुपटाला युगयात्रा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment