किनवट : सूर्याच्या प्रखर तडाख्यामुळे तालुक्यातील अनेक भागांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. नदी-नाल्यांची पात्रं कोरडी पडली असून, अनेक ठिकाणच्या विहिरी व बोअर आटले आहेत. परिणामी, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांची फरफट सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींनी विहीर व विंधनविहीर अधिग्रहणासाठी एकूण ५४ प्रस्ताव पंचायत समितीकडे सादर केले होते. यापैकी ४७ प्रस्तावांची स्थळपाहणी पूर्ण करून ते तहसील कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती सहाय्यक गटविकास अधिकारी पी. जी. वैष्णव यांनी दिली.
या प्रस्तावांमध्ये ३४ विंधनविहीर व १३ पारंपरिक विहिरींचा समावेश आहे. उर्वरित मलकवाडी, इस्लापूर, टिंगणवाडी, कणकवाडी, बेल्लारी जा., आंदबोरी चि. व मारेगाव (वरचे) या सात गावांची स्थळपाहणी नुकतीच करण्यात आली असून, हे प्रस्तावही तहसीलकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहेत.
तालुक्यातील १३४ ग्रामपंचायतींपैकी गोंडे महागाव, मानसिंग नाईक तांडा, कोठारी सी., निराळा तांडा, परोटी, मोहपूर, दिपला नाईक तांडा, तोटंबा, वडोली, सावरगाव, शिरपूर, रोडा नाईक तांडा, दयाल धानोरा, मारला गुंडा, सिंगरवाडी, प्रधान सांगवी, इरेगाव, मलकजाम तांडा, कंचेली, धानोरा सी., अंबाडी, टेंभी रायपूर, चिंचखेड, करंजी ई., तल्लारी, नंदगाव, कोपरा या गावांतील आणि त्यांच्या वाड्या-तांड्यांतील पाणीटंचाई ग्रस्त नागरिकांकडून ही मागणी करण्यात आली होती.
दरम्यान, गोंडे महागाव, दुर्गानगर व मानसिंग नाईक तांडा येथील विंधनविहिरींना अधिग्रहणासाठी तातडीची मंजुरी मिळाली आहे. विशेष म्हणजे, इस्लापूर येथील पैनगंगा नदीवरील सहस्त्रकुंड धबधबा व डोह पूर्णपणे कोरडा पडला असून, त्यावर अवलंबून असलेले परोटी तांडा, रिठा, इस्लापूर आदी गावांमध्ये पाणीटंचाईचे संकट अधिक तीव्र झालं आहे.
तालुक्याच्या बहुतांश भागात सूर्य आग ओकत आहे, उन्हाची तीव्रता वाढत चालली असून, भूगर्भातील जलस्तर झपाट्याने घसरत आहे. त्यामुळे ग्रामविकास प्रशासनाला पाणीपुरवठ्यासाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याची निकड निर्माण झाली आहे.
No comments:
Post a Comment