मुंबई : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या (महापारेषण) कार्यकारी संचालकपदी (मानव संसाधन) अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीमती सुचिता भिकाने यांची नियुक्ती करण्यात आली. श्रीमती भिकाने यापूर्वी कोकण भवन येथे उपायुक्त (भूसंपादन) या पदावर कार्यरत होत्या.
श्रीमती भिकाने यांनी पुण्यातील कृषी महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेतले असून दापोलीच्या कोकण कृषी विद्यापीठातून पदव्यूत्तर शिक्षण घेतले आहे. तसेच त्यांनी विधी शाखेची (एलएलबी) पदवीही घेतली आहे. त्यानंतर २०१० मध्ये त्या थेट महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून उपजिल्हाधिकारी म्हणून शासकीय सेवेत रूजू झाल्या. त्यांनी सांगलीमध्ये रोजगार हमी योजनेमध्ये चार वर्षे उपजिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामध्ये साडेचार वर्षे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन व पुनर्वसन) म्हणून काम केले आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामध्ये व्यवस्थापकीय संचालक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. सातारा जिल्ह्यातील पाटणमध्ये प्रांताधिकारी म्हणूनही काम केल्याचा त्यांचा अनुभव आहे.
तसेच लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उत्कृष्ट काम केल्याचा त्यांच्याकडे दांडगा अनुभव आहे. सांगलीमध्ये रोजगार हमी योजना, जलयुक्त शिवार अभियान व शतकोटी वृक्ष लागवडीमध्ये त्यांनी मुख्य योगदान दिले आहे. त्यांच्या या कामांमुळे उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी पुरस्काराने त्यांना गौरविले आहे.
No comments:
Post a Comment