छत्रपती संभाजीनगर : लोककवी वामनदादा कर्डक यांचे शिष्य गुरुवर्य प्रतापसिंग दादा बोदडे आणि भीमशाहीर विजयानंद दादा जाधव यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त एक अनोखा प्रबोधनपर संगीत कार्यक्रम "वामन वेलीवरच्या दोन फुलांचा जन्मोत्सव" याचे उद्या, शनिवारी ( दि. २८ ) सायंकाळी ७ वाजता उस्मानपूरा येथील संत एकनाथ रंगमंदिर येथे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष कार्यक्रमात गीत, संगीत आणि सामाजिक संदेश यांची सुरेल सांगड घालण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे, प्रबोधनात्मक गीतांच्या माध्यमातून समाजाला विचारप्रवृत्त करणारा या सांस्कृतिक उत्सवाचे हे दुसरे वर्ष आहे. सादरकर्त्यांमध्ये महाराष्ट्रातील नामवंत आवाज कुणाल वराळे, अजय देहाडे, चेतन चोपडे, सचिन भुईगळ, विजय पवार, अक्षय जाधव आणि निकिता बंड हे कलाकार सामाजिक गीतांच्या माध्यमातून गुरुवर्य बोदडे आणि भीमशाहीर जाधव यांना सुरेल अभिवादन करणार आहेत. प्रा. दिलीप महालिंगे यांनी या कार्यक्रमाची संहिता व निर्देशन केले आहे. या कार्यक्रमाद्वारे सामाजिक समतेचे, परिवर्तनाचे आणि प्रबोधनाचे वारसदार असलेल्या या दोन थोर व्यक्तिमत्त्वांच्या कार्याची आठवण आणि प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होणार आहे. कार्यक्रमासाठी प्रवेश मोफत असून सर्वांनी उपस्थित राहून सामाजिक जाणीवेला स्वर आणि शब्दातून उजाळा द्यावा, असे आयोजकांनी आवाहन केले आहे.
कधी: शनिवार, २८ जून २०२५, सायंकाळी ७ वाजता
कुठे: संत एकनाथ रंगमंदिर, उस्मानपुरा, छत्रपती संभाजीनगर
No comments:
Post a Comment