मुंबई :- देशात मागील ११ वर्षांपासून अघोषीत आणीबाणी सुरू आहे. त्याबद्दल कोण बोलत नाही. सरकारविरोधी बोलणाऱ्यांना देशद्रोही ठरविले जात आहे. पाशवी बहुमताच्या जोरावर पुन्हा हिंदीची सक्ती केल्यास खांद्याला खांदा लावून आम्ही सर्वजण रस्त्यावर उतरू, सत्तेची मस्ती चालू देणार नाही, असा इशारा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आझाद मैदानातून राज्य सरकारला दिला.
ते पुढे म्हणाले की, हिंदी सक्तीचा जीआर शासनाने मागे घेतला आहे. परंतु, हा निर्णय घेतला नसता तर ५ जुलैरोजी मराठी बांधवांनी हा जीआर एकजुटीने मागे घेण्यास सरकारला भाग पाडले असते. त्यामुळे ही एकजूट कायम ठेवा. सत्ताधारी विधानसभेला कसे निवडून आले, हे त्यांनाही कळेना. सरकार कसे आले, हेही त्यांना माहित नाही. शेतकऱ्यांना नक्षलवादी म्हणून संभावना करण्याचे काम त्यांनी केले. जन सुरक्षा कायदा आणताय, मात्र पहलगाममध्ये अतिरेकी आलेले कुठे गेले? असा प्रश्न ठाकरे यांनी केला.
दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सांगून आणीबाणी लावली होती. देशात आता अघोषित आणीबाणी १० वर्षांपासून सुरू आहे. सभागृहात त्यांचे बहुमत असेल, मात्र रस्त्यावर सत्ता आपली आहे, हिंदीची सक्ती आम्ही तोडून मोडून टाकीन. विधेयक तुम्ही आणताय. मात्र, या विधेयकाला आम्ही विरोध केल्या शिवाय राहणार नाही.
काल हिंदी विरोधात पक्षभेद विसरून एकत्र आला. तसेच पुन्हा एकदा यावं लागेल. माझे सगळे आमदार विरोध करतील. रस्त्यावरची लढाई लढावी लागेल, असेही ते म्हणाले.
५ जुलै रोजी विजयी मेळावा होणार आहे. त्यावेळी सर्वांनी एकजुट दाखवा. आपण जरा विखुरल्याचे दिसताच मराठी द्रोही डोके वर काढतात. पण ही डोकी आपण ठेचून चिरडून काढलेली आहेत. त्यामुळे यांचा पुन्हा फणा वर येऊ नये, पुन्हा संकट येऊ नये, यासाठी ही एकजुट आपण कायम ठेवली पाहिजे. या एकजुटीचे दर्शन आम्ही ५ जुलै रोजी दाखवून देऊ, असेही ते म्हणाले.
No comments:
Post a Comment