स्वा.रा. ती. म. विद्यापीठात होणार बेसिक फिल्म मेकिंग कोर्स ; FTII पुणे आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ यांचे संयुक्त आयोजन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday, 9 September 2025

स्वा.रा. ती. म. विद्यापीठात होणार बेसिक फिल्म मेकिंग कोर्स ; FTII पुणे आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ यांचे संयुक्त आयोजन

नांदेड :

चित्रपटसृष्टीत रस असलेल्या तरुणांसाठी सुवर्णसंधी उपलब्ध करून देत फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII), पुणे व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने बेसिक कोर्स इन फिल्म मेकिंग हा पाच दिवसीय अल्पकालीन अभ्यासक्रम विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र संकुलात  आयोजित करण्यात येत आहे. हा कोर्स ६ ते १० ऑक्टोबर २०२५ दरम्यान घेण्यात होणार आहे. 

या प्रशिक्षणात चित्रपटनिर्मितीची मूलभूत तत्त्वे सखोल व प्रत्यक्ष अनुभवातून शिकवली जाणार आहेत. स्क्रिप्ट रायटिंग, स्टोरीबोर्डिंग, कलाकारांची निवड ,लोकेशन सिलेक्शन ,कॅमेरा ऑपरेशन, शॉट कंपोझिशन, लाईटिंग तंत्र  आदी बाबी शिकविल्या जाणार आहेत. ध्वनी रेकॉर्डिंग, एडिटिंग, पोस्ट-प्रॉडक्शन या बाबींवर विशेष भर देण्यात येईल. शेवटच्या टप्प्यात गटाने मिळून एक लघुपट तयार करण्याची संधी प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणार आहे.

या कोर्ससाठी किमान पात्रता १२वी उत्तीर्ण असून, विशेष प्रकरणात १०वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही संधी दिली जाऊ शकते. वयोमर्यादा १८ वर्षे पूर्ण (१ ऑक्टोबर २०२५ रोजी) अशी आहे. प्रवेश फर्स्ट्  कम फर्स्ट्  सर्व्ह  या तत्त्वावर होणार असून विद्यार्थ्यांची निवड होणार आहे , कमाल ३० विद्यार्थी या कोर्समध्ये सहभागी होऊ शकतील. 

चित्रपटनिर्मिती या क्षेत्रात नवे प्रयोग करण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारचे अल्पकालीन कोर्स म्हणजे दिशा दाखवणारा टप्पा ठरतो. विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक अनुभवातून काम करण्याची संधी मिळाल्यामुळे आत्मविश्वास वाढतो, तसेच तांत्रिक ज्ञानाची सांगड सर्जनशीलतेशी कशी घालायची याची जाण होते. या प्रशिक्षणातून विद्यापीठातील विद्यार्थी, स्थानिक तरुण, तसेच चित्रपटनिर्मिती क्षेत्रात प्रवेश करू इच्छिणारे नवोदित कलाकार व तंत्रज्ञ यांना लाभ होणार आहे.

विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र संकुलातर्फे सातत्याने नवे प्रयोगशील अभ्यासक्रम राबवले जात असून, एफ. टी. आय. आय.  (FTII) सारख्या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेसोबतचे सहकार्य ही विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी असल्याचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी म्हटले आहे . विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र संकुलाने यापूर्वीही विविध राष्ट्रीय कार्यशाळा, परिसंवाद, चित्रपट महोत्सव आयोजित केले आहेत. एफ. टी. आय. आय. (FTII) पुणे यांच्याशी केलेल्या सामंजस्य करारातून (MoU) पुढील काळात स्मार्टफोन फिल्म मेकिंग, स्क्रीन अॅक्टिंग, डिजिटल मीडिया यासारखे कौशल्याधारित कोर्सेस राबवण्याची तयारी सुरू असल्याचे त्यांनी  सांगितले. त्यामुळे नांदेडमध्येच फिल्म शिक्षणाचे नवे दालन खुलणार असून, मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना पुणे, मुंबई गाठण्याची गरज भासणार नाही.

या कोर्सचा लाभ घ्यावा असे आवाहन माध्यमशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. राजेंद्र गोणारकर (९८९०६१९२७४) , डॉ. सचिन नरंगले , डॉ. सुहास पाठक यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages