मुंबई: विरार पश्चिम येथील विराट नगर परिसरात मैत्रेय प्रतिष्ठाण (रजि.) यांच्या विद्यमाने महाकठिण चीवरदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. १२ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ९.३० वाजता मैत्रेय बुध्द विहार येथे हा कार्यक्रम भिक्खु संघाच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणार आहे.
कठिण चीवरदान हे वर्षातून फक्त एकदाच करता येणारे महादान मानले जाते. उपासक व उपासिकांनी आपल्या आयुष्यात एकदा तरी श्रद्धेने हे दान करावे, असे भगवान बुद्धांनी सांगितले आहे. या दानातून पाच प्रकारचे विशेष पुण्यलाभ मिळतात. आश्विन पोर्णिमेपासून कार्तिक पोर्णिमेपर्यंतच हे दान करता येते. प्राचीन काळी उपासक उपासिका कापसापासून धागा तयार करून, त्यातून वस्त्र शिवून तयार करून भिक्खु संघाला दान करत असत. आजही भारतातील अनेक भागांत ही परंपरा प्रचलित आहे.
कार्यक्रमात त्रिसरण-पंचशील, कठिण चीवरदान, संघदान, परित्राण पाठ, भोजनदान आणि धम्मदेसना यांसारख्या धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे, चेवुर, छत्रपती संभाजीनगर, सायन, गोरेगाव आणि विरार येथील आदरणीय भिक्खु संघ उपस्थित राहणार असून कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपासक-उपासिका हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
उपस्थित राहून शुभ्र वस्त्र परिधान करून या पुण्य कार्यात सहभागी व्हा आणि आयुष्यातील पुण्यलाभ साधा, अशी मंगल कामना आयोजकांनी केली आहे.

No comments:
Post a Comment