नांदेड, २४ :- मागील 3 दिवसापासुन मराठवाडा भागात भारतीय हवामान खात्याकडुन यलो अलर्ट देण्यात आलेला होता. तसेच जालना, परभणी, छत्रपती संभाजी नगर या भागामध्ये मोठया प्रमाणात पाऊस झाल्यामुळे आणि जायकवाडी धरणातुन मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात सोडल्यामुळे विष्णूपुरी धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढली आहे.
याच पार्श्वभूमीवर विष्णुपुरी धरणाचे 16 दरवाजे उघडुन 2,50,000 क्युसेक च्या प्रवाहाने पाणी नदीपात्रात सोडण्यात येत असुन गोदावरी नदीने इशारा पातळी 351 मीटर ओलांडुन सध्या 352.05 मीटर ही धोका पातळी गाठलेली आहे. त्यामुळे नदीकाठी असलेल्या मनपा हद्दीतील खडकपुरा, दुल्हेशाह रहेमान नगर, जी.एम.कॉलनी, गाडीपुरा कालापुल परीसर, गंगाचाळ, भिमघाट, नावघाट मल्ली परीसर, बिलाल नगर, पाकीजा नगर, शंकर नगर, वसरणी इत्यादी सखल भागातील नाल्याकाठच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरले आहे.
वसरणी मधील पंचवटी नगर येथील श्रीमती महालाबाई विठ्ठलराव महात्मे वय 72 वर्ष रा.पंचवटी नगर वसरणी येथुन सदर महिलेस मनपाच्या अग्निशमन दलाचे अग्निशमन अधिकारी केरोजी दासरे, उप अग्निशमन अधिकारी निलेश कांबळे तसेच शिवाजी शिंदे, पेरकेवाड, कदम व ताटे यांनी बचाव कार्य करुन सदर महिलेस सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत केले. त्याचप्रमाणे सदर पथकाने अनिकेत गादेवार यांच्या श्वान फार्मिंग येथुन 23 श्वान (पाळीव प्राणी) सुध्दा बचाव करुन सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत केले आहेत. तसेच शेख मिनाज साजीद बागवान वय 15 वर्ष रा. सैलाब नगर खडकपुरा ह्या मुलाचा पाण्यात बुडुन दुर्देवी मुत्यु झाला असुन मनपाच्या जीवरक्षकांनी त्याचे शव पाण्यातुन काढुन त्याच्या कुटुंबियांना स्वाधीन केले आहे.
बाधित नागरिकांना स्थलांतरित करण्यासाठी सहा क्षेत्रिय कार्यालयांतर्गत एकूण 10 तात्पुरती निवारा केंद्रे कार्यान्वित केली असून त्यापैकी क्षेत्रिय कार्यालय क्र. 4 अंतर्गत किल्ला येथे 28,गांधी राष्ट्रीय विद्यालय गाडीपुरा येथे 45,नवनिहाल शाळा खडकपुरा येथे 165,मार्कंडेय मंदीर येथे 36 अशा एकूण 274 नागरिकांना
स्थलांतरित केले असुन त्या ठिकाणी पिण्याचे पाणी, जेवण, नाश्ता, ग्रीन मॅट, व विद्युत व्यवस्था इत्यादीची सोय करण्यात आलेली आहे.
विष्णुपुरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये होणाऱ्या पावसामुळे पाण्याचा विसर्ग वाढत असुन परिणामी विष्णुपुरी धरणातुन अजुन जास्त पाण्याचा विसर्ग सोडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मनपाच्या सर्व क्षेत्रिय अधिकाऱ्यांना तसेच वाहनांकरीता यांत्रिकी विभाग, स्वच्छता विभाग व इतर विभाग प्रमुख यांना सदैव सतर्क राहण्याचे निर्देश *मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. महेशकुमार डोईफोडे* यांनी दिले असुन मनपाच्या अग्निशमन विभाग व विशेष बचाव पथकास सुध्दा आवश्यकतेनुसार बचाव कार्याकरीता सदैव सतर्क रहाण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.
कोणत्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्याकरिता महानगरपालिका सदैव सज्ज असुन शहरातील नागरिकांनी नदीकाठी जाऊ नये, तथापि आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरीकांनी घाबरुन न जाता तात्काळ महानगरपालिकेच्या अहोरात्र सुरु असलेल्या नियंत्रण कक्षातील 02462-262626, 230721 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन महापालिका प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment