नांदेड, 25 - स्वच्छता ही आपल्या जीवनातील अविभाज्य भाग आहे. ग्रामस्थांनी पुढाकार घेतला, तर गावाचा कायापालट होऊ शकतो आणि आपली गावे देशपातळीवर वेगळी ओळख निर्माण करू शकतात, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांनी केले.
स्वच्छता ही सेवा पंधरवडा निमित्त एक दिवस, एक तास, एक साथ या विशेष उपक्रमांतर्गत नांदेड तालुक्यातील वडवणा येथे आज महाश्रमदानातून ग्रामसफाई करण्यात आली. याप्रसंगी सीईओ मेघना कावली यांनी स्वतः श्रमदान करून स्वच्छतेत सहभाग घेतला.
या वेळी सरपंच पंचकला पोहरे, सरपंच परिषदेचे अध्यक्ष नारायण कदम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमित राठोड, गटविकास अधिकारी आडेराघो, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रविण मुंडे, उपसरपंच राधा कदम, केंद्रीय संचार ब्युरोचे सुमित डोडल, वैद्यकीय अधिकारी पी.के. डवले, ग्रामविकास अधिकारी के.एस. तिडके आदींची उपस्थिती होती.
पुढे म्हणाल्या, स्वच्छता ही सेवा पंधरवड्यासोबतच जिल्ह्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सुरू आहे. या उपक्रमात गावांनी प्रभावीपणे काम करून सहभाग नोंदवावा. यातून राज्यस्तरीय पाच कोटी रुपयांचे बक्षीस मिळवण्याची संधी आहे. स्वच्छतेच्या बळावर राळेगणसिद्धी, हिवरे बाजार, पाटोदा यांसारखी गावे देशभरात नावारूपास आली. त्यात धर्तीवर नांदेड जिल्हयातील गावेही पुढे यावीत, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमित राठोड यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना, ग्रामस्वच्छतेसाठी सातत्याने सक्रिय सहभाग महत्त्वाचा आहे. आठवड्यातून किमान एक तास गावासाठी काढून स्वच्छता केली पाहिजे, असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी आडेराघो यांनी केले. त्यानंतर सीईओ कावली यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांना शालेय बॅगचे वाटप त्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच वृक्षलागवडही करण्यात आली.
या कार्यक्रमाला सीईओंचे स्विय सहाय्यक शुभम तेलेवाड, माहिती, शिक्षण व संवाद तज्ञ मिलिंद व्यवहारे, महेंद्र वाठोरे, चैतन्य तादुळवाडीकर, सुशिल मानवतकर, उपअभियंता संजय देशमुख, कृषी अधिकारी माने, विस्तार अधिकारी व्ही.बी. कांबळे, सुभाष गीते, सतिश लकडे, आर.पी. केंद्रे, सुरेश इंगोले, चेतन जाधव, शुभम कांबळे, प्रविण गायकवाड, माहिनी जाधव यांच्यासह ग्रामस्थ, महिला व प्रतिष्ठित व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment