नांदेड, २७ :- हवामान खात्याने दि. २७.०९.२०२५ रोजी नांदेड जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट दिला होता. तथापी काल दिनांक २६.०९.२०२५ रोजी रात्रीपासून शहरात व परिसरात सतत मुसळधार पाऊस होत आहे. गोदावरी नदीच्या वरच्या भागातून सुद्धा पावसाचे पाणी विष्णुपुरी धरणामध्ये येत असल्यामुळे धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात होत असल्याने नांदेड शहरात पूर परिस्थिती निर्माण झाली या पार्श्वभूमीवर महापालिकेचे यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून नागरिकांना पूर परिस्थितीमध्ये उद्भवणाऱ्या परिस्थितीवर महापालिका प्रशासन लक्ष ठेवून आहे.
सद्यस्थितीत विष्णुपुरी धरणाचे 16 दरवाजे उघडे असून सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत 2,50,000 क्युसेक च्या प्रवाहाने पाणी नदीपात्रात सोडण्यात येत असुन नदीची पाणी पातळी सद्यस्थितीत 352.53 मिटर इतकी आहे. तथापी धरणात पाण्याची आवक व मुसळधार पाऊस पाहता आज रात्री पर्यंत 3,00,000 क्यूसेक इतक्या प्रवाहाने धरणातून पाणी सोडण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोदावरी नदी 351 मीटर इशारा पातळी ओलांडल्यानंतर 354 मीटर धोका पातळी ओलांडण्याची दाट शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.महेशकुमार डोईफोडे यांनी परिस्थितीचा तात्काळ आढावा घेऊन मनपा सर्व यंत्रणांना सजग आणि सुसज्ज राहण्यासाठी आदेशित केले आहे. त्याचप्रमाणे सर्व संबंधित क्षेत्रिय अधिकारी यांना आपण व सर्व टीम सतर्क ठेवण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.
महापालिका आयुक्तांनी परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर बाधित क्षेत्रामध्ये नागरिकांना सतर्कतेबाबत तात्काळ आवाहन करून, नदीकाठी असलेल्या मनपा हद्दीतील खडकपुरा, दुल्हेशाह रहेमान नगर, जी.एम.कॉलनी, गाडीपुरा कालापुल परीसर, गंगाचाळ, भिमघाट, नावघाट मल्ली परीसर, बिलाल नगर, पाकीजा नगर, शंकर नगर, वसरणी इत्यादी सखल भागातील नाल्याकाठच्या वस्त्यांमध्ये परत नदीचे पाणी शिरत असल्याकारणाने बाधित नागरिकांना स्थलांतरित करण्यासाठी कार्यान्वित केलेली निवारा केंद्र सुरू ठेवण्याच्या व आवश्यकतेनुसार केंद्रांच्या संख्येत वाढ करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. निवारा केंद्रांवर अन्न,पाणी व इतर आवश्यक बाबी,वैद्यकीय सुविधा तसेच प्रकाश व्यवस्था करण्यासाठी संबंधित विभागांना आदेशित करण्यात आले आहे.
काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार व संततधार पावसामुळे श्रावस्ती नगर,चुनाल नाला, तेहरा नगर, MR कॉलोनी, भिमसंदेश कॉलोनी, पंचशील नगर, व आजू बाजूच्या परीसात मोठ्या प्रमाणात पाणी गेले असून परिस्थिती अजून बिकट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदर ठिकाणी शोध व बचाव कार्य करण्याची आवश्यकता पडू शकते. त्यामुळे अग्निशमन विभागासोबत ( DRF पथक) शोध व बचाव कार्य करणेसाठी 20 जीवरक्षकांची टीम सज्ज ठेवण्यात आली आहे. तसेच नावघाट पूल परत पाण्याखाली गेल्यामुळे दोन्ही बाजूने बॅरिकेटिंग लाऊन वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेला आहे. व सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सदर ठिकाणी जीवरक्षक तैनात ठेवण्यात आलेले आहेत.
महापालिकेने स्थापित केलेल्या तात्पुरत्या निवारा केंद्रामध्ये आतापर्यंत एकूण 304 नागरिक स्थलांतरित करण्यात आलेले असुन त्यांना जेवण , पाणी विद्युत व्यवस्था, चटई इत्यादींची सोय करण्यात आलेली आहे. तसेच उक्त सर्व निवारा केंद्रावर मनपाच्या आरोग्य विभागातर्फे वैद्यकीय अधिकाऱ्यांची पथके स्थापन केली असुन सदर ठिकाणी नागरीकांची वैद्यकीय तपासणी देखील सुरु आहे.
•शोध व बचाव कार्य
श्रावस्ती नगर व समीराबाग येथील नगरामध्ये 12 ते 15 फूटा पर्यंत पाणी विसर्ग होत होते. सदरील ठिकाणी अग्निशमन विभागाची एक बचाव पथक रबर बोट आउट बोट मशीन सहित श्रावस्ती नगर येथील 15 नागरीकांना पाण्यातील प्रवाहापासून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. येथील सर्व लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवल्यानंतर लागलीच समीराभाग खडकपुरा कडे ही रेस्क्यू टीम रवाना झाली समीराभाग मधील पाण्याच्या प्रवाहात अडकलेल्या सहा 06 लोकांना अशा प्रकारे एकुण 21 नागरीकांचा बचाव (Rescue) करुन सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आहे.
नावघाट पुलावरील पालिकेची पाणी पुरवठा राइजिंग मेन लाईन पुराच्या पाण्यामुळे क्षतिग्रस्त झाली असल्याने जुन्या नांदेड शहरास पाणी पुरवठा करणे शक्य नसून सदर जलवाहिनीची दुरुस्ती पुराचे पाणी ओसरल्याबरोबर हाती घेण्यात येईल.
बाधित क्षेत्रातील नागरिकांना आवश्यकतेनुसार निवारा केंद्रामध्ये स्थलांतरित करणेसाठी तसेच सखल भागांत साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी यांत्रिकी विभागातर्फे 08 जेसीबी, 02 ब्रेकर मशीन, 02 गॅस कटर, 04 बसेस, 04 आयशर गाडया, 04 पाण्याचे टँकर हि यंत्रसामुग्री उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच स्वच्छता विभाग व इतर विभाग प्रमुख यांनी सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
विष्णुपुरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये होणाऱ्या पावसामुळे पाण्याचा विसर्ग वाढत असुन परिणामी विष्णुपुरी धरणातुन अजुन जास्त पाण्याचा विसर्ग सोडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मनपाच्या सर्व क्षेत्रिय अधिकाऱ्यांना तसेच वाहनांकरीता यांत्रिकी विभाग, स्वच्छता विभाग व इतर विभाग प्रमुख यांना सदैव सतर्क राहण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी दिले असुन मनपाच्या अग्निशमन विभाग व विशेष बचाव पथकास सुध्दा आवश्यकतेनुसार बचाव कार्याकरीता सदैव सतर्क रहाण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.
शहरातील कोणत्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्याकरिता महानगरपालिका सदैव सज्ज असुन शहरातील नागरिकांनी नदीकाठी जाऊ नये, तथापि आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरीकांनी घाबरुन न जाता तात्काळ महानगरपालिकेच्या अहोरात्र सुरु असलेल्या नियंत्रण कक्षातील 02462-262626, 230721 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन महापालिका प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.




No comments:
Post a Comment