जायकवाडी धरणातून गोदावरी नदीत 1 लाख 22 हजार क्युसेकचा विसर्ग; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday, 28 September 2025

जायकवाडी धरणातून गोदावरी नदीत 1 लाख 22 हजार क्युसेकचा विसर्ग; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन


     संभाजीनगर (प्रतिनिधी) : जायकवाडी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात तसेच धरण परिसरात 27 सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे धरणातील जलपातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू करण्यात आला आहे. जायकवाडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्र. पु. संत यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी 9.30 वाजता धरणातून 1,22,616 क्युसेक पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आले.

     भारतीय हवामानशास्त्र विभागाने संभाव्य अतिवृष्टीचा इशारा दिल्याने धरणात पाण्याची आवक आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोदावरी नदीपात्रात विसर्ग 2,00,000 क्युसेक किंवा त्यापेक्षा जास्त करण्याची तयारी जलसंपदा विभागाने केली आहे.

गोदावरी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नागरीकांनी कोणत्याही परिस्थितीत नदीपात्रात पात्रात प्रवेश करू नये. नदीकाठावरील गावांतील नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. जीवित किंवा वित्तहानी टाळण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि नागरिकांनी दक्ष राहावे. धरणातील आवक लक्षात घेऊन विसर्गात बदल होऊ शकतो.

    धरणातून सोडण्यात येणारा वाढीव विसर्गाबाबत जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंता सुनंदा जगताप यांनी आमदार राजेश विटेकर यांना माहिती पाठवली आहे. विसर्गाचा दर सतत वाढत असल्यामुळे प्रशासनाने तातडीने गावकऱ्यांना सतर्कतेचे निर्देश जारी केले आहेत.

    पावसाचा जोर आणि धरणातील वाढती आवक लक्षात घेता, पुढील काही तास हे गोदावरी नदीकाठच्या नागरिकांसाठी निर्णायक ठरणार असून, प्रशासन सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

No comments:

Post a Comment

Pages