किनवटमध्ये ओला दुष्काळ, कर्जमुक्ती व नुकसानभरपाईसाठी शेतकरी–शेतमजुरांचा एल्गार! १० ऑक्टोबर रोजी किसान सभेचे धडक आंदोलन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday, 4 October 2025

किनवटमध्ये ओला दुष्काळ, कर्जमुक्ती व नुकसानभरपाईसाठी शेतकरी–शेतमजुरांचा एल्गार! १० ऑक्टोबर रोजी किसान सभेचे धडक आंदोलन


किनवट : ओला दुष्काळ जाहीर करावा, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपये मदत आणि शेतमजुरांना प्रति कुटुंब ३० हजार रुपये श्रम नुकसानभरपाई द्यावी, या मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने शुक्रवारी(दि. १०) सकाळी ११.३० वा. किनवट येथे धडक आंदोलन छेडण्यात येणार आहे. या आंदोलनाची सुरुवात रेल्वे स्टेशन किनवट येथून होऊन उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात येणार आहे.


या आंदोलनाचे नेतृत्व कॉ. अर्जुन आडे (राज्य उपाध्यक्ष, किसान सभा, म.रा.), कॉ. शंकर सिडाम (राज्य सहसचिव, किसान सभा, म.रा.), कॉ. किशोर पवार (रा.क.स. किसान सभा) व कामगार नेते कॉ. जनार्धन काळे करणार आहेत. आंदोलनात हजारोंच्या संख्येने शेतकरी, शेतमजूर, कामगार व महिलांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


गत ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे  तालुक्यातील शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकरी आणि शेतमजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा परिस्थितीतही राज्य सरकारने केवळ गुंठ्याला ८५ रुपयांची मदत जाहीर केली असून, ही मदत शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठ चोळणारी ठरत असल्याची टीका किसान सभेने केली आहे. पंजाब आणि कर्नाटक राज्यांमध्ये एकरी ५० हजार रुपये मदत दिली असताना महाराष्ट्रात तुटपुंजी मदत देऊन सरकार शेतकऱ्यांची थट्टा करत असल्याचा आरोप नेत्यांनी केला आहे.


    ओला दुष्काळ तत्काळ जाहीर करावा,अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपये मदत द्यावी, शेतकरी, शेतमजुरांची संपूर्ण कर्जमुक्ती करावी, शेतमजुरांना प्रति कुटुंब ३० हजार रुपये श्रम नुकसानभरपाई द्यावी, सर्व पिकांना १००% विमा संरक्षण देऊन सरसकट परतावा वाटावा, पशुधन नुकसानीसाठी ८० हजार रुपये मदत जाहीर करावी, सर्व योजना कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू करावे, रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरांना ८०० रुपये मजुरीसह काम द्यावे, अतिवृष्टीमुळे वाहून गेलेल्या जमिनींसाठी बाजारभावानुसार मोबदला द्यावा, विद्यार्थ्यांच्या सर्व प्रकारच्या शैक्षणिक फी माफ कराव्यात, किनवट शहरातील पुरग्रस्तांना प्रति घर २५ हजार रुपये सानुग्रह अनुदान द्यावे या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या आहेत.


किसान सभेच्या नेत्यांनी सांगितले की, “सरकार जाती–धर्माच्या राजकारणात जनतेला गुंतवून ठेवत असताना शेतकऱ्यांचे खरे प्रश्न मागे पडले आहेत. म्हणूनच जाती–पातीचे बंधन विसरून ‘शेतकरी आणि श्रमिक’ म्हणून सर्वांनी एकत्र येऊन लढा देणे आवश्यक आहे.”


या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन कॉ. अमोल आडे, सुनिता बोनगिर, इरफान पठाण, खंडेराव कानडे, आडेलु बोनगीर, शेषेराव ढोले, संजय मानकर, शैलया आडे, मनोज सल्लावार, प्रल्हाद चव्हाण, डॉ. बाबाराव डाखोरे आदींनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages