“मायमराठीचा सोहळा : मराठवाड्यात रंगणार ‘अन्य मराठी जिल्हा साहित्य संमेलनांचा’ उत्सव”
किनवट, दि.६ : महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीने येत्या तीन महिन्यांत संपूर्ण राज्यभर “अन्य मराठी साहित्य संमेलन” या योजनेअंतर्गत जिल्हास्तरीय संमेलनांचे आयोजन करण्यात येत आहे. मराठवाड्यातील सातही जिल्ह्यांमध्येही या संमेलनांचा साहित्यिक आणि सांस्कृतिक जल्लोष अनुभवता येणार आहे.
मराठी भाषा व संस्कृतीचा प्रसार, तसेच स्थानिक साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या संमेलनांची आखणी करण्यात आली आहे. योजनेअंतर्गत प्रत्येक जिल्हा संमेलन आयोजक संस्थेला मंडळाकडून पाच लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले असून, त्या निधीतून अर्थपूर्ण, आकर्षक आणि वैविध्यपूर्ण कार्यक्रम राबवले जाणार आहेत.
नांदेड, परभणी, लातूर, बीड, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली आणि किनवटसह संपूर्ण मराठवाड्यात डिसेंबर अखेरपर्यंत ही संमेलने पार पडतील. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळून एक वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हे संमेलन अधिक महत्त्वाचे ठरणार आहे.
या संमेलनांत कवी संमेलन, साहित्य परिसंवाद, ग्रंथदिंडी, ग्रंथप्रदर्शन, लेखकांच्या प्रकट मुलाखती आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातील. मराठी साहित्यातील विविध प्रवाह, विचारधारा आणि साहित्यिक परंपरांचे चिंतन या माध्यमातून होणार आहे.
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ संतसाहित्य अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत या संमेलनांच्या नियोजनावर सविस्तर चर्चा झाली. या बैठकीत सर्व सदस्यांनी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी या उपक्रमाची आवश्यकता अधोरेखित केली.
मराठवाड्यातील विविध सेवाभावी संस्था या संमेलनांच्या आयोजनासाठी पुढे येत असून, त्यांचा सहभाग आणि उत्साह पाहता हा साहित्योत्सव भव्य, सांस्कृतिक आणि अविस्मरणीय ठरेल, अशी माहिती मंडळाचे सदस्य डॉ. मार्तंड कुलकर्णी यांनी दिली.
No comments:
Post a Comment