अरे बाप रे... १ डॉलर = ₹ ९०.१३ !
भारतीय रुपयाची ऐतिहासिक घसरण
नवी दिल्ली :- भारतीय रुपयामध्ये ऐतिहासिक घसरण झाली आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयानं ९० रुपयांचा टप्पा ओलांडला आणि आतापर्यंतचा नीचांक गाठला. व्यापार आणि पोर्टफोलिओमधील मंदीचा ओघ आणि भारत-अमेरिका व्यापार करारातील स्पष्टतेबद्दलच्या चिंतेमुळे चलनावर दबाव निर्माण झाला. मंगळवारी अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया ९०.१३ इतका घसरला, जो त्याच्या मागील ८९.९४७५ या नीचांकी पातळीपेक्षा खूपच कमी होता.
आपल्यावर कसा परिणाम होईल ?
डॉलर हे जगातील सर्वात मोठे चलन आहे, जे बहुतेक व्यवहारांसाठी वापरलं जातं. डॉलरच्या घसरणीचा तात्काळ परिणाम महागाईत वाढ होण्यानं होऊ शकतो. आपण परदेशातून आयात करत असलेल्या वस्तू अधिक महाग होतील, जसं की पेट्रोल, खतं, सोनं, इलेक्ट्रॉनिक्स आणि मशीनचे भाग. भारत मोठ्या प्रमाणात खाद्यतेल आणि डाळी आयात करतो. डॉलरच्या वाढीमुळे तेल आणि डाळींच्या किमती वाढू शकतात, ज्यामुळे त्यांच्या किमतींवर परिणाम होईल. यामुळे तुमचं स्वयंपाकघर बजेट विस्कळीत होऊ शकतं. शिवाय, परदेशी शिक्षण, प्रवास, डाळी, खाद्यतेल, कच्चं तेल, कम्प्युटर, लॅपटॉप, सोनं, औषधं, रसायनं, खतं आणि आयात केलेली अवजड यंत्रसामग्री अधिक महाग होऊ शकते.
नीति आयोगाचे माजी उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी सांगितलं की, प्रमुख जागतिक चलनांच्या तुलनेत रुपयाची घसरण अर्थव्यवस्थेसाठी चांगली आहे. त्यांनी सांगितलं की यामुळे भारतातील कामगार-केंद्रित निर्यातीला प्रोत्साहन मिळते, परकीय चलन कमाई वाढते आणि रोजगाराच्या संधी निर्माण होतात. प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ म्हणाले की आर्थिक ताकदीचं प्रतीक म्हणून तथाकथित मजबूत रुपया ही कल्पना सोडून देण्याची वेळ आली आहे. या घसरणीबद्दल त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे.

No comments:
Post a Comment