चेंबूर नाका बस थांब्याला मातोश्री रमाई आंबेडकर प्रसूतिगृह नाव देण्याची मागणी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday, 4 February 2026

चेंबूर नाका बस थांब्याला मातोश्री रमाई आंबेडकर प्रसूतिगृह नाव देण्याची मागणी

 चेंबूर नाका बस थांब्याला मातोश्री रमाई आंबेडकर प्रसूतिगृह नाव देण्याची मागणी 




मुंबई : बहुजन समाजाच्या स्वाभिमानाशी निगडित असलेल्या मागण्यांकडे शासन–प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ बहुजन लोकनिर्धार सामाजिक संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री. राकेश म. गायकवाड यांनी आज दिनांक ३ फेब्रुवारी २०२६ पासून चेंबूर नाका, मातोश्री रमाई आंबेडकर प्रसूतीगृहाबाहेर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे.

चेंबूर नाका बस थांब्याला ‘मातोश्री रमाई आंबेडकर प्रसूतीगृह’ असे नाव देण्यात यावे तसेच प्रसूतीगृहाच्या आवारात मातोश्री रमाई आंबेडकर यांचा भव्य पुतळा उभारण्यात यावा, या रास्त व न्याय्य मागण्यांसाठी हे आंदोलन छेडण्यात आले आहे. अनेकदा निवेदने देऊनही शासनाने कानाडोळा केल्याने आता रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय उरलेला नसल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले.




या आमरण उपोषणाला परिसरातील नागरिकांचा वाढता पाठिंबा मिळत असून आंदोलनस्थळी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. समाजसेवक विवेक काकडे, प्रशांत दवटे, संतोष साळवे यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते, संघटनांचे पदाधिकारी व बहुजन बांधव आंदोलनात सहभागी होत आहेत.

“मातोश्री रमाई आंबेडकर या केवळ एक नाव नसून बहुजनांच्या संघर्षाची ओळख आहेत. त्यांच्या नावाला न्याय मिळेपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही,” असा ठाम इशारा आंदोलकांनी दिला आहे. लवकरात लवकर मागण्या मान्य न झाल्यास या आंदोलनाची धग संपूर्ण महाराष्ट्रभर पसरल्याशिवाय राहणार नाही आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी शासन व प्रशासनावर राहील, असा स्पष्ट निर्वाळा देण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

Pages