विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी झटणारे एस.टी.चे चालक-वाहक 'देवदूत'; किनवट संशोधन केंद्रातर्फे विशेष गौरव - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday, 18 April 2026

विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी झटणारे एस.टी.चे चालक-वाहक 'देवदूत'; किनवट संशोधन केंद्रातर्फे विशेष गौरव

विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी झटणारे एस.टी.चे चालक-वाहक 'देवदूत'; किनवट संशोधन केंद्रातर्फे विशेष गौरव


किनवट: आजच्या धावपळीच्या आणि मेट्रो शहरांतील असुरक्षिततेच्या बातम्यांच्या काळात, ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसाठी एस.टी. महामंडळाची बस आजही कशी सुरक्षित आणि 'संजीवनी' ठरते, याचे आदर्श उदाहरण किनवट येथे पाहायला मिळाले. आपल्या कर्तव्यापलीकडे जाऊन विद्यार्थिनींची बालकाप्रमाणे काळजी घेणारे महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे चालक गुरुसिंग ठाकूर आणि वाहक वैशाली किनागे यांचा आज 'कै. उत्तमराव राठोड आदिवासी विकास व संशोधन केंद्र' (स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र, किनवट) येथे भव्य सत्कार करण्यात आला.


बी.एस.डब्ल्यू. (BSW) प्रथम वर्षात शिकणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना दररोज सकाळी न चुकता त्यांच्या गावापासून केंद्राच्या गेटपर्यंत सुरक्षित पोहोचवणे आणि सायंकाळी वर्ग संपल्यानंतर स्वतः फोन करून किंवा वर्गापर्यंत येऊन विद्यार्थिनींना बसमध्ये बसवून घरी पोहोचवण्याचे काम हे दोघेही वर्षभरापासून अविरतपणे करत आहेत. विशेष म्हणजे, ज्या विद्यार्थिनींचे बस पास संपले असतील, त्यांचे नाव नोंदवून स्वतःच्या खिशातील पैसे खर्च करून त्यांना पास काढून देण्यापर्यंतची संवेदनशीलता या चालक-वाहकांनी दाखवली आहे.


विद्यार्थिनींच्या परीक्षेचा आज शेवटचा दिवस होता. वर्षभर मिळालेल्या या सुरक्षित सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी केंद्राच्या वतीने विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्राचे समन्वयक डॉ. नितीन गायकवाड यांच्या हस्ते चालक गुरुसिंग ठाकूर व वाहक वैशाली किनागे यांना पुष्पहार आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.


या गौरव सोहळ्याला अभिजीत इंडस्ट्रीचे मालक यशवंत जाधव साहेब व सामाजिक कार्यकर्ते विनायक गव्हाणे आणि  केंद्राच्या प्राध्यापिका प्रीती देवस्थळे, डॉ. प्रमोद राठोड, डॉ. प्रवीण खंडागळे, प्रा. चेतन जाधव, प्रा. श्रीकांत दुधारे, प्रा.  पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच केंद्रातील कर्मचारी विठ्ठल हंबर्डे, रमेश जकुलवार, वर्षाताई, रामभाऊ आणि दररोज प्रवास करणाऱ्या सर्व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


"ग्रामीण भागातील मुलींनी शिक्षण घ्यावे यासाठी पालकांचा एस.टी.वर मोठा विश्वास असतो. ठाकूर आणि किनागे यांनी हा विश्वास सार्थ ठरवला आहे. अशा प्रामाणिक कर्मचाऱ्यांमुळेच महामंडळाची प्रतिमा उंचावत आहे," असे गौरवद्गार केंद्राचे समन्वयक डॉ. नितीन गायकवाड यांनी यावेळी काढले.


या आगळ्यावेगळ्या सत्काराची चर्चा संपूर्ण परिसरात होत असून, महामंडळाच्या या 'कर्तव्यदक्ष' कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment

Pages