रेल्वे विषयक मागण्या मान्य नाही झाल्या तर तीव्र आंदोलन करू - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 27 November 2019

रेल्वे विषयक मागण्या मान्य नाही झाल्या तर तीव्र आंदोलन करू

रेल्वे विषयक मागण्या मान्य नाही झाल्या तर तीव्र आंदोलन करू
-उध्दवराव रामतीर्थकर

किनवट (प्रतिनिधी):  आमच्या किनवट परिसराच्या रेल्वे विषयक  मागण्या मान्य नाही झाल्या तर, किनवट, माहूर, हिमायतनगर, भोकर व मुदखेड या तालुक्यातील सर्व पक्ष, सामाजीक संघटना व व्यापारी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू व हा रेल्वेमार्ग बंद पाडू, असा इशारा  रेल्वे संघर्ष समितीचे सचिव उध्दवराव रामतीर्थकर यांनी दिला आहे.
    साने गुरुजी रुग्णालयाच्या सभागृहात रेल्वे प्रश्नांवर  परिसरातील कार्यकर्त्यांची  नुकतीच विस्तारीत बैठक झाली.यावेळी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी भारत जोडो युवा अकादमीचे अध्यक्ष डाॅ.अशोक बेलखोडे हे होते.
     किनवट ,माहूर, हिमायतनगर भोकर व  मुदखेड हे सर्व तालुके नांदेड जिल्ह्यातील अविभाज्य भाग आहे.आदिलाबाद कडे जाणा-या रेल्वे  मार्गावरून अधिकच्या गाड्या जाऊ नये व रेल्वे प्रवाशांची गैरसोय व्हावी,अशी नांदेडच्या काही तथाकथित कार्यकर्त्यांची संकुचित भावना आहे.यामुळे ते आमच्या मागणीप्रमाणे या मार्गावर मंजूर होत असलेल्या रेल्वे गाड्यांचा विरोध  करीत आहेत.
          नुकतेच दक्षिण-मध्य रेल्वेच्या विभागांतर्गत खासदारांच्या व लोकप्रतिनिधींच्या बैठकीत रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी या मार्गावरून प्रवाशांच्या गरजा लक्षात घेऊन औरंगाबाद -आदिलाबाद ही विशेष रेलगाडी सुरु करु,अशी घोषणा केली होती.
    किनवट हे रेल्वेस्टेशन महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या तीर्थक्षेत्रात जोडून आहे. त्यासोबतच श्रीक्षेत्र उनकेश्वर आहे. इस्लापूर स्थानकाला जोडून सहस्त्रकुंड धबधबा आहे. पैनगंगा अभयारण्य आहे. किनवट रेल्वे स्थानक हे सर्वाधिक उत्पन्न रेल्वे प्रशासनाला देते. दोन लाख रुपये प्रतिदिन किनवट रेल्वे स्थानकाची तिकिटाची विक्री आहे. हे रेल्वे स्टेशन "ड " दर्जाचे आहे. उत्पन्न पाहता या रेल्वे स्थानकाला "ब" दर्जानुसार सुविधा देण्याची मागणीही यावेळी बैठकीत करण्यात आली.
     नांदेड बेंगलोर ही गाडी पण या मार्गावर सुरू करावी. पूर्वी श्रीगंगानगर गाडी या मार्गावरून मंजूर झाल्यानंतर ती दुसऱ्या मार्गावरून पळविली आहे.  या मार्गाचा फक्त मालवाहतुकीसाठी उपयोग केला जात असेल प्रवाशांचे हिताचे होत नसेल तर हा मार्ग म्हणजे असून अडचण नसून खोळंबा असाच ठरणारा आहे. यावेळी उपस्थितांनी आपले विचार व्यक्त करून नांदेडच्या मराठवाडा रेल्वे प्रवासी संघाचा जाहीर निषेध नोंदविला.  यावेळी डॉ. अशोक बेलखोडे, नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, प्रा. किशनराव किनवटकर, प्रा. रामप्रसाद तौर, दिनकरराव चाडावार, के. मूर्ती, शिवराज राघू मामा यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages