खुल्या मतदानाने बहुमत चाचणी घ्या: सर्वोच्च न्यायालयाचा आदेश - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 26 November 2019

खुल्या मतदानाने बहुमत चाचणी घ्या: सर्वोच्च न्यायालयाचा आदेश


खुल्या मतदानाने बहुमत चाचणी घ्या: सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

नवी दिल्ली: महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस- अजित पवार सरकारची उद्याच म्हणजे बुधवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत खुल्या मतदानाने बहुमत चाचणी घ्या, या बहुमत चाचणीचे लाइव्ह प्रक्षेपण करा, असा महत्वाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने आज, भारतीय संविधान दिनाच्या दिवशीच दिला.

          बहुमत नसतानाही गुपचुप शपथविधी उरकणाऱ्या देवेंद्र फडणवीस- अजित पवार सरकारविरुद्ध काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने हा निकाल दिला. लोकशाही मूल्यांचे रक्षण झाले पाहिजे. लोकांना चांगले सरकार मिळवण्याचा अधिकार आहे. घोडेबाजार रोखण्यासाठी काही आदेश देणे गरजेचे आहे. कोणतेही गुप्त मतदान न घेता उद्याच्या उद्या सायंकाळी पाच वाजेपर्यंत बहुमत चाचणी घ्या, असे सर्वोच्च न्यायालयाने हा निकालात म्हटले आहे. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष निवडून आमदारांना शपथ दिली जाईल. बहुमत चाचणीत गुप्त मतदान घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने मनाई केली आहे. त्याऐवजी या संपूर्ण बहुमत चाचणी प्रक्रियेचे लाइव्ह प्रक्षेपण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बुधवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत हंगामी विधानसभा अध्यक्षाची निवड करावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत. तिन्ही पक्षांनी न्यायालयाच्या या निकालावर समाधान व्यक्त केले आहे. न्या. एन. व्ही. रमण, न्या. अशोक भूषण आणि न्या. संजीव खन्ना यांच्या त्रिसदस्यीय न्यायपीठाने हा निकाल दिला. सत्य परेशान हो सकता है, पराजित नही, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी या निकालानंतर दिली आहे. तर बहुमत चाचणीआधीच देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

Pages