नामविस्तार छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असा करावा..
-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार “छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ” असा करण्याबाबत कायदेशीर प्रक्रिया त्वरित सुरु करावी, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांना केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून त्यांचा योग्य तो सन्मान राखणे गरजेचे आहे. त्यांचे कर्तृत्व केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून सर्व भारतीयांच्या मनात त्यांच्याविषयी आदराची भावना आहे. म्हणूनच त्यांचा एकेरी उल्लेख टाळण्यासाठी हा बदल करण्याचे मुख्यमंत्र्यांनी सुचविले आहे. यापूर्वी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि रेल्वे स्थानकाच्या नावात देखील छत्रपती शिवाजी महाराज असा संपूर्ण उल्लेख करण्यात आला आहे.
अशाच रितीने केवळ शिवाजी महाराजच नव्हे तर राज्याच्या सर्व आदरणीय महापुरुष व दैवतांच्या नावाने असणाऱ्या शासकीय योजना, कार्यक्रम व ठिकाणे यांचा नामविस्तार करून त्यांच्या संपूर्ण नावाचा उल्लेख करण्याच्या दृष्टीने बदल करण्याचा मानस देखील मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. उदाहरणादाखल केवळ जोतिबा फुले असे न म्हणता महात्मा जोतिराव फुले, संभाजी ऐवजी छत्रपती संभाजी महाराज असे नामविस्तार करून या महापुरुषांचा योग्य तो गौरव करावा, या दृष्टीने संबंधित विभागांनी कार्यवाही सुरु करावी असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
No comments:
Post a Comment