प्रलंबित रेल्वे मागण्यांसाठी सर्वपक्षीय आंदोलन..
नांदेड: किनवट वासियांच्या प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या विविध रेल्वे संदर्भातील मागण्या मान्य होत नसल्याच्या निषेधार्थ मंगळवारी ( दि.१०) सकाळी ११ वाजता सर्वपक्षीय रेल्वे कृती समिती, तालुका मराठी पत्रकार परिषद व व्यापारी संघटनेच्या वतीने किनवट रेल्वेस्थानकातील प्रांगणामध्ये धरणे आंदोलन करण्यात आले. तसेच यासंदर्भातील निवेदन महाप्रबंधक, दक्षिण मध्य रेल्वे, सिंकदराबाद आणि संबंधितांकडे पाठविण्यात आले.
सर्वपक्षीय रेल्वे कृती समिती व किनवट तालुका मराठी पत्रकार परिषद यांच्या वतीने प्रदीर्घ काळापासून रेल्वे प्रशासनाला वारंवार विविध मागण्यांचे निवेदन देऊनही, आजपावेतो कुठलीही मागणी मान्य न झाल्यामुळे नाईलाजाने रेल्वे प्रशासनाला जाग यावी म्हणून मंगळवारी किनवट रेल्वे स्थानकातील प्रांगणामध्ये धरणे आंदोलन करण्यात येऊन रेल्वे प्रशासना विरुद्ध निषेध नोंदविण्यात आले.
नांदेड-आदिलाबाद हा लोहमार्ग १६५ कि.मी.चा आहे. या मार्गावर जिल्ह्यातील मुदखेड, भोकर, हदगाव, हिमायतनगर व किनवट हे पाच तालुके येतात. किनवट तालुका हा आदिवासीबहुल अतिदुर्गम तालुका म्हणून सबंध महाराष्ट्रात ओळखल्या जातो. या तालुक्यात उणकेश्वर येथील गरम पाण्याची कुंडे, शरभंग ऋषीचा आश्रम तसेच सहस्त्रकुंड येथील प्रसिद्ध धबधबा शिवाय माहूर येथील लाखो भाविकांची कुलदेवता रेणुकामाता, दत्तात्रेय व सती अनसूया मंदिर विख्यात आहेत. त्यामुळे देशभरातून भाविकांची वर्दळ या लोहमार्गावरून बाराही महिने चालू असते. मात्र त्यामानाने रेल्वेच्या फेर्या कमी आहेत. म्हणून येथील नागरिकांची प्रदीर्घ काळापासून मुंबई - नांदेड तपोवन एक्सप्रेस, पनवेल-नांदेड-पनवेल, नांदेड-बंगलुरू-नांदेड ह्या गाड्यांचे आदिलाबाद पर्यंत विस्तारीकरण करावे. आदिलाबाद ते औरंगाबाद विशेष पॅसेंजर, या सोबतच गोकुंदा येथे रेल्वे गेटवर उड्डाणपूल व शिवाजीनगर येथील भुयारी पुलाचे काम त्वरित सुरू करण्यात यावे, किनवट रेल्वे स्थानकाचे मासीक उत्पन्न ५० लक्ष रुपये असूनही सदर स्टेशनचा दर्जा ‘ड’ आहे. तो उत्पन्नाच्या आधारावर सुधारून वाढविण्यात यावा, तसेच फलाटावर रेल्वे कोच क्रमांक बोर्ड लावावेत, प्रतिक्षालय, शौचालय स्वच्छतेसह २४ तास उघडे ठेऊन प्रवाशांची सोय करावी, या मार्गावरील रेल्वेच्या गतीतही वाढ करावी व गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी रेल्वे पोलिसांची संख्या वाढवावी इत्यादी मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलना दरम्यान माजी नगराध्यक्ष इसाखान, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख व्यंकट भंडारवार, भाजपचे नेते अशोक नेम्मानीवार, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य समितीचे सदस्य अर्जुन आडे, पीरिपाचे जिल्हाध्यक्ष विनोद भरणे, भाकपचे नेते गंगारेड्डी बैनमवार, माजी नगराध्यक्ष दिनकर चाडावार, शेतकरी संघटनेचे नेते त्रिभुवन ठाकूर, भाजपचे नारायण सिडाम, शिवसेनेचे बालाजी मुरकुटे, डॉ. अशोक चिन्नावार आदी सर्वपक्षीय नेत्यांनी रेल्वे प्रशासनावर सडकून टीका करीत मनोगत व्यक्त केले. तसेच दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक ता.१३ डिसेंबर रोजी या मार्गावरील सर्व रेल्वेस्थानकांचा पाहणी दौरा करणार आहेत. या दुर्गम भागातील प्रवाशांची मागणी मान्य न केल्यास, रेल्वे रोको आंदोलन करण्याचा सज्जड इशारा रेल्वे कृती समितीचे प्रा. किशनराव किनवटकर, माजी नगराध्यक्ष के. मुर्ती, तसेच सर्वपक्षीयांच्या वतीने देण्यात आला. सदर धरणे आंदोलनात नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, अभियंता प्रशांत ठमके, माजी प्राचार्य वि.मा.शिंदे, धनलाल पवार, सुनिल इटेकपेल्लीवार, अखिलखान, रेल्वे संघर्ष समितीचे सचिव उद्धव रामतीर्थकर, पत्रकार प्रदीप वाकोडीकर, गोकुळ भवरे, किरण किनवटकर, दुर्गादास राठोड, गौतम कांबळे,दिलीप पाटील यांचेसह विकासप्रेमी नागरिकांची बहुसंख्येने उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment