तस्करी होणारे कट साईज सागवान लाकडे पकडण्यात वनविभागाला यश - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 14 December 2019

तस्करी होणारे कट साईज सागवान लाकडे पकडण्यात वनविभागाला यश

तस्करी होणारे कट साईज सागवान लाकडे पकडण्यात वनविभागाला यश

किनवट :  तिरुपतीकडून  आदिलाबादकडे जाणार्‍या कृष्णा एक्स्प्रेस रेल्वेमधून सागवान कटसाईज चोरट्या मार्गाने जात असल्याची खबर वनविभागाच्या अतिक्रमण निर्मूलनच्या फिरत्या पथकाला शुक्रवारी मिळाल्यानंतर, त्यांनी धावपळ करुन ते अवैध सागवान पकडले. यात कोरीवकाम केलेला सुटा सोफासेट होता. त्याची बाजारभावाप्रमाणे किंमत सुमारे ३५ हजार रुपये  असल्याचे सांगण्यात आले. लाकूड चोरांचा हा व्यवसाय नित्याचाच असून अनेक वेळा रेल्वेत चोरटे सागवान फर्निचर पकडल्या गेले आहे. त्यामुळे  रेल्वे प्रशासन याबाबत खरंच अनभिज्ञ असेल का? या विषयी नागरिकांत तर्कवितर्क  सुरू आहेत.

          तिरुपतीकडून आदिलाबाद येथे जाणारी कृष्णा एक्स्प्रेस ही पहाटे  साडे पाचच्या वाजेच्या दरम्यान किनवट रेल्वे स्थानकात येते.  त्या रेल्वेने नियमितपणे चोरटे सागवानचे तयार फर्निचर आदिलाबादकडे जात असते. तसेच किनवटहून नांदेड व त्याहीपुढे घेऊन जाणारी टोळी सक्रीय असल्याची बाब लपून राहिलेली नाही. वनविभागाला (प्रादेशिक) मात्र याची खबर नसल्यामुळे, त्यांचे पथक रेल्वेकडे ढुंकूनही पहात नाही. उशिरा का होईना परंतू शुक्रवारी (दि.१३) खबर्‍याने  वनविभागाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाला खबर दिल्याने, फिरत्या पथकाचे वनपरिक्षेत्राधिकारी योगेश शेरेकर आणि सामाजिक वनीकरण विभागाचे वनपरिक्षेत्राधिकारी निशिकांत कापगाते, प्रादेशिकचे वनपरिक्षेत्राधिकारी के.एन.खंदारे यांनी फिरत्या पथकचे वनपाल बालाजी संतवाले, वनरक्षक अरुण चुक्कलवार, साईनाथ पवार, अनिल फोले, व्यंकट सारगे, भावसिंग जाधव व वाहनचालक बाळू आवळे यांना सोबत घेऊन किनवटचे रेल्वे स्थानक गाठले. त्यावेळी रेल्वेत सागवान लाकडाचे कोरीव सोफासेट आढळून आला. मात्र सागवान तस्कर मात्र नेहमीप्रमाणे फरार झालेत. हे विशेष. सदर चोरट्या वनउपजाची मोजदाद केली असता, ते  ०.१३०८ धनमिटर भरली असून, त्याचे बाजारमुल्य सुमारे ३५ हजार असल्याचे समजले. याबाबत गुन्ह्याची नोंद केली आहे.

        किनवट रेल्वेस्थानक परिसर हे  चोरट्या लाकडाच्या निर्यातीचे केंद्र बनले आहे. या ठिकाणी नेहमीच चोरटे लाकूड पकडल्या गेले आहे. रेल्वेतून विनापरवाना आणि विनावाहतूक पासेस शिवाय सागवान लाकूड जातेच कसे? याला चाप का बसत नाही, याचा शोध घेणे गरजेचे आहे. वनविभाग, सामाजिक वनीकरण व वनविकास महामंडळाने संयुक्तरित्या पथक नेमून प्रत्येक रेल्वेगाड्यांची झडती घेतल्यास, या अवैध धंद्यास आळा बसण्यास मदत होऊ शकते. औरंगाबादचे मुख्य वनसंरक्षक आर.एम.सोनटक्के, नांदेडचे उप वनसंरक्षक आशिष ठाकरे तसेच सहाय्यक वनसंरक्षक व्ही.एन.गायकवाड यांनी किनवटच्या वनसंपत्तीचे संगोपन व संरक्षण करण्यासाठी उचित पावलं उचलावीत नसता जंगल शिल्लक राहणार नाही, अशी वनप्रेमींची मागणी आहे.

No comments:

Post a Comment

Pages