परतीचा पाऊस यंदा वाजवीपेक्षा अधिक लांबल्याने तालुक्यातील रब्बीच्या क्षेत्रात दुपटीपेक्षा जास्त वाढ - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 20 December 2019

परतीचा पाऊस यंदा वाजवीपेक्षा अधिक लांबल्याने तालुक्यातील रब्बीच्या क्षेत्रात दुपटीपेक्षा जास्त वाढ


परतीचा पाऊस यंदा वाजवीपेक्षा अधिक लांबल्याने तालुक्यातील रब्बीच्या क्षेत्रात दुपटीपेक्षा जास्त वाढ

किनवट :  परतीचा पाऊस यंदा वाजवीपेक्षा अधिक लांबल्याने तालुक्यातील रब्बीच्या क्षेत्रात दुपटीपेक्षा जास्त वाढ झाली आहे. तालुका कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 269.28 टक्के क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली आहे.

         किनवट तालुक्यात बोधडी, जलधरा, इस्लापूर, शिवणी, दहेली, मांडवी व किनवट अशी 7 महसुल मंडळे असून, तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र 1 लाख 56 हजार 753 .68 हेक्टर आहे. त्यातील लागवडी खालील क्षेत्र 82 हजार 360 हेक्टर आहे. किनवट तालुक्यात बागायत वा सिंचन क्षेत्र हे खरीप क्षेत्राच्या केवळ पाच टक्क्याच्या आसपास असल्यामुळे, कोरडवाहू पिकेच जास्त घेतली जातात. त्यामुळे कृषी विभागाच्यावतीनं  तालुक्यातील 5 हजार 384 हेक्टर क्षेत्रावर रब्बी पेरणीचं नियोजन केलं गेलं होतं. मात्र परतीचा पाऊस आॅक्टोबर अखेरपर्यंत लांबल्यामुळे पेरणीला विलंब झाला. दरम्यान शेतकर्‍यांची खरीपातील मूग,उडदासह सोयाबीन व ज्वारी आदी काढल्या गेल्यामुळे रानही उपलब्ध झाले. त्यामुळे  किनवट तालुक्यात आतापर्यंत केवळ 14 हजार 498 हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झाली असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.

      शेतकर्‍यांनी यंदाच्या रब्बी हंगामात गव्हापेक्षा हरभर्‍याच्या पिकाला पसंती दिल्याचे पेर्‍यावरुन दिसून येते. हरभरा पिकाला येत असलेला कमी खर्च व त्यातून मिळणारे अधिक उत्पादन तसेच सिंचनासाठी लागणारे कमी पाणी यामुळे हरभर्‍याच्या क्षेत्रात वाढ झाल्याचे दिसते. मात्र तृणधान्यातील  रब्बी गहू, ज्वारी व  मका यांच्या सर्वसाधारण लागवड क्षेत्रातही यंदा दुपटीपेक्षा जास्त वाढ झाली आहे. गळीत धान्यातील करडई, रब्बी तीळ,  सूर्यफूल, जवस, मोहरी या पिकांना मात्र शेतकर्‍यांनी पूर्णपणे फाटा दिलेला आहे.

     तालुक्यात यंदा कडधान्यामध्ये हरभर्‍यासाठी 3 हजार 486 हेक्टर क्षेत्र लागवडीसाठी होते. मात्र शेतकर्‍यांच्या पसंतीमुळे यंदा आतापर्यंत 8 हजार 547 हेक्टर क्षेत्रावर हरबरा पेरला गेला आहे. तृणधान्यात गहू लागवडीच्या क्षेत्राचे नियोजन 1 हजार 398 हेक्टर होते. मात्र प्रत्यक्षात 2 हजार 401 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. रब्बी ज्वारीसाठी 165 हेक्टर क्षेत्राचे नियोजन असतांना त्यात तब्बल  नऊ पटीने वाढ होऊन 1 हजार 529 हेक्टरवर यंदा ज्वारी पेरल्या गेली. मक्यासाठी 276 हेक्टर लागवडीचे क्षेत्र असतांना त्यात पाच पटीपेक्षा जास्त वाढ होऊन 1 हजार 540 हेक्टरवर मक्याची लागवड झालेली आहे. ज्वारी व मका पिकांच्या लागवडीत झालेली वाढ ही शेतकर्‍यांनी उन्हाळ्यात पशूंच्या चार्‍यात होणार्‍या भरमसाट वाढीच्या अनुभवातून केलेले नियोजन वाटते. तालुक्यातील रब्बी हंगामात यंदा 262 हेक्टर क्षेत्रावर भाजीपाल्याची लागवड झालेली असून, कोथिंबीर (धने) 126 हेक्टरवर पेरल्या गेली आहे. शिवाय केळीची लागवड 22 हेक्टरवर तर पपईची लागवड 2 हेक्टरवर करण्यात आली आहे. डिसेंबर महिन्याअखेर पर्यंत रब्बीची पेरणी चालू राहणार असून, अंतीम पीक पेरणी अहवाल प्राप्त झाल्यानंतरच तालुक्यातील रब्बीच्या पेरणीचे चित्र स्पष्ट होईल.

No comments:

Post a Comment

Pages