थायलंड येथील जागतिक स्पर्धेत नांदेडची भाग्यश्री जाधव करणार भारताचे प्रतिनिधीत्व - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 18 January 2020

थायलंड येथील जागतिक स्पर्धेत नांदेडची भाग्यश्री जाधव करणार भारताचे प्रतिनिधीत्व



आंतरराष्ट्रीय खेळाडू भाग्यश्री जाधवची आयवाज -2020 स्पर्धेसाठी निवड, थायलंड येथील जागतिक स्पर्धेत करणार भारताचे प्रतिनिधीत्व


      नांदेड - येथील आंतरराष्ट्रीय अष्टपैलू दिव्यांग खेळाडू भाग्यश्री माधवराव जाधवची येत्या 20 ते 28 फेब्रुवारी 2020 या कालावधीत थायलंड येथे होणार्‍या जागतिक ‘आयवाज’  2020 स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
         नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील होनवडज येथील रहिवाशी असलेल्या भाग्यश्री माधवराव जाधव या अष्टपैलू दिव्यांग खेळाडूने राज्य व राष्ट्रीय पॅराअ‍ॅथेलेटिक्स क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी केल्यानंतर तिची निवड गतवर्षी चीन येथे झालेल्या पॅराअ‍ॅथेलेटिक्स वर्ल्ड चॅम्पीअनशीप स्पर्धेसाठी झाली होती. गोळाफेक व भालाफेक या क्रीडा प्रकारात भाग्यश्री जाधवने दोन कास्य पदकांवर आपले नाव कोरुन भारताचा झेंडा फडकाविला होता.

       सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या भाग्यश्री जाधव हिने आर्थिक स्थिती अत्यंत बेताची असून देखील जिद्द मेहनत व चिकाटीच्या जोरावर तिने हे यशोशिखर गाठले आहे.  ‘आयवाज’ या जागतिक संघटनेच्यावतीने दि.20 ते 28 फेब्रुवारी 2020 या कालावधीत थायलंडमध्ये जागतिक पातळीवरील दिव्यांग क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘स्पोर्टस सेन्ट्रल बोर्ड ऑफ इंडिया फॉर दि डिसेबल’ यांच्याकडून सदर स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय दिव्यांग खेळाडू भाग्यश्री जाधवची निवड झाली असून या स्पर्धेत महाराष्ट्रा बरोबरच भारताचे प्रतिनिधीत्व करण्याचा बहुमान भाग्यश्री जाधवला प्राप्त झाला आहे.

      या निवडीबद्दल भाग्यश्री जाधवचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. जागतिक पातळीवर क्रीडा नैपुण्य सादर करण्याची पुनश्च संधी या स्पर्धेच्या निमित्ताने पुन्हा प्राप्त झाली असून या संधीचे आपण निश्चितच सोने करीत देशाचा नावलौकिक कायम ठेऊ अशी प्रतिक्रिया भाग्यश्री जाधवने व्यक्त केली. क्रीडा क्षेत्रात अनेक अष्टपैलू खेळाडू आहेत. परंतु आर्थिक अडचणींमुळे त्यांना संधी गमवावी लागते. माझ्यासहीत सर्व खेळाडूंना आर्थिक संकटाचा सामना  करावा लागतो. समाजातील सर्व स्तरातील दानशूर लोकांनी जर मदतीचा हात पुढे केला तर क्रीडा क्षेत्रातील कोमेजून गेलेल्या या फुलांचा सुगंध दरवळल्याशिवाय राहणार नाही अशा शब्दात तिने आर्थिक मदतीची अपेक्षा व्यक्त केली.

No comments:

Post a Comment

Pages