दोन फेब्रुवारीला कोल्हापुरात दुसरे धम्मविचार साहित्य व संस्कृती संमेलन
कोल्हापूर : मानवी समाजाच्या विकासातील एक महत्त्वाचे अंग म्हणजे संस्कृती. संस्कृती हा मानवाच्या जीवनाचा अविभाज्य घटक. तिच्याशिवाय मानवाचे जगणेसुद्धा शून्यच. ही संस्कृती चित्रकला, शिल्पकला, गाणी, नाटके, कोरीवकाम, साहित्य अशा विविध अंगानी बहरलेली असते. माणसांचे जीवन फक्त अन्न, वस्त्र, निवारा एवढ्या गरजा भागण्यातून चालत नाही. संस्कृतीची निर्मिती ही अन्नधान्य, हत्यारे, उपकरणे इत्यादींच्या निर्मिती इतकीच मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्याशिवाय माणसे ही माणसे राहू शकत नाहीत. भारतात स्त्रीप्रधान आणि नंतर गणसंघ संस्कृती निर्माण होईपर्यंत शोषण करणार्या शासनाचे प्रभुत्व निर्माण झाले नव्हते. इ. स. पूर्व सहाव्या शतकाच्या दरम्यान जातिव्यस्थेची प्राथमिक लक्षणे
दिसू लागली, परंतु गौतम बुद्ध आणि धम्माच्या प्रभावामुळे इ. स. च्या
सहाव्या शतकापर्यंत जातिव्यवस्था पक्की होऊ शकली नाही. तेथून पुढे
इंग्रजी सत्तेपासून ते स्वातंत्र्य मिळेपर्यंत जातिव्यवस्था पक्केपणाने शोषण करत होती. याचा प्रभाव शोषित जनतेच्या सांस्कृतिक निर्मितीवर झाला. तरीही बसवण्णा, कबीर, तुकोबा आणि वारकरी संत अशा अनेक माध्यमातून जातिव्यवस्था आणि तिच्याशी जोडलेल्या संस्कृतीला आव्हान दिले गेले.
मानवमुक्तीची संस्कृती निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर इत्यादींच्या नेतृत्वाखाली भांडवली, साम्राज्यवादी, जातियवादी आणि धर्मांध संस्कृतीला पर्याय देणार्या सांस्कृतिक चळवळी उभ्या राहिल्या. 1967 ते 1980 पर्यंतच्या काळात आधुनिक साम्राज्यवादी आणि भांडवली संस्कृतीच्या पार्श्वभूमीवर जातिव्यवस्था आणि स्त्रियांचे शोषण यांना आव्हान देणारे साहित्य आणि संस्कृती मोठ्या प्रमाणावर निर्माण झाले. मानवाचे निसर्गाशी असलेल्या नातेसंबंधातून निर्माण होणारी कला, नवनिर्मितीचा अविष्कार हा कलेतून प्रकट होत असतो. मानवाला समृद्ध करणार्या सुंदर जगाची सुंदर संस्कृतीची पाळेमुळे याच मातीत रोवली आहेत. या मातीतल्या संत परंपरा, सुफी परंपरांनी तर मानवाच्या समृद्धीकरणाची धुरा वाहिली. संत बहिणाबाई, संत जनाबाई यांनी तर आपल्या ओव्यांमधून स्त्रियांचे दुःख, व्यथा मांडल्या. दुःखविरहित, शोषणविरहित जगाची मांडणी करणारे बुद्ध, मार्क्स ते फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांच्या आधारावर मानवाच्या सुंदर आणि समृद्ध जगाची निर्मिती करण्याचा संकल्प आम्ही करीत आहोत.
नव्या साहित्य व कलेची निर्मिती हा जनसंघर्षाचा भाग आहे. यातूनच तेजस्वी कलावंत व साहित्यिक निर्माण होऊ शकतात ही भूमिका घेऊन, हेच आशावादी स्वप्न उराशी बाळगून धम्मविचारांचा जागर करण्यासाठी कोल्हापूर मध्ये दुसरे धम्मविचार साहित्य व संस्कृती संमेलन राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे रविवार दि. 2 फेब्रुवारी 2020 रोजी संपन्न होत आहे. पाच सत्रात होत असलेल्या या संमेलनाचे उद्घाटन वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर, धम्म अभ्यासिका धम्मचारिणी रत्नश्री यांच्या हस्ते होणार असून संमेलनाचे अध्यक्ष लेखक व इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे आहेत. स्वागताध्यक्ष प्रा. कपिल राजहंस असून या संमेलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बाबुराव गुरव, दिशा पिंकी शेख यांची उपस्थिती राहणार आहेत. या संमलेनाच्या निमंत्रक धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा प्रा. करुणा मिणचेकर या असून यावेळी सन्माननीय उपस्थिती म्हणून भदंत आर. आनंद, भदंत एस. संबोधी, प्रा. आनंद भोजने, एस. पी. दीक्षित, ऍड. कृष्णा पाटील, हिंदुराव हुजरे-पाटील, सुशील कोल्हटकर, प्रिया शिरगावकर, सुरेश केसरकर, दयानंद ठाणेकर, प्रा. शोभा चाळके, विमल पोखर्णीकर आदि मान्यवर उपस्थित राहाणार आहेत.
सकाळी 10ः00 पासून सुरु होणारे हे संमेलन पाच सत्रात होणार असून यावर्षीचा धम्म प्रवर्तक जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ इतिहास संशोधक मा. म. देशमुख यांना जागतिक किर्तीच्या विचारवंत डॉ. गेल ऑम्वेट यांच्या हस्ते देण्यात येणार आहे.
तिसर्या सत्रात दुपारी 3:00 पासून... प्रसिध्द कवी डॉ. रवींद्र श्रावस्ती यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन होणार असून यावेळी निमंत्रित कवी म्हणून डॉ. सतिश पाटील, डॉ. शिवाजीराव पाटील, डॉ. आनंदा गुरव, सतिश भारतवासी, मंदार पाटील, अमोल महापुरे, रंजना सानप, रोहित कांबळे, मच्छिंद्र कांबळे,शांतीलाल कांबळे, अतुल वाघ आदि कवी सहभागी होणार आहेत. यावेळी नवकवींना कविता सादर करण्याची संधी दिली जाणार आहे.
चौथ्या सत्रात धम्मविचार आणि क्रांती या विषयावर दुपारी 4:30 पासून... आंबेडकरवादी विचारवंत डॉ. विठ्ठल शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार असून अॅड. इंद्रजित कांबळे, डॉ. अरुण गाडे, डॉ. सोमनाथ कदम, प्रा. किरण भोसले, गौतम वर्धन आदी सहभागी होणार आहे.
No comments:
Post a Comment