मुंबईची झेन सदावर्ते, औरंगाबादचा आकाश खिल्लारेला राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 21 January 2020

मुंबईची झेन सदावर्ते, औरंगाबादचा आकाश खिल्लारेला राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार


मुंबईची झेन सदावर्ते, औरंगाबादचा आकाश खिल्लारेला राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार


नवी दिल्लीः अतुलनीय धाडस दाखवून बाल वयातच आपल्या शौर्याची चुणूक दाखवणारी मुंबईची झेन सदावर्ते आणि औरंगाबाद जिल्ह्यातील आकाश खिल्लारेला राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रजासत्ताकदिनी हे शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात येतील. दहा वर्षाच्या झेन सदावर्ते हीने एका 17 मजली इमारतीला लागलेल्या आगीतून आपल्या शेजाऱ्यांची सुखरुप सुटका केली होती तर पंधरा वर्षाच्या आकाश खिल्लारेने नदीत बुडणाऱ्या महिलेला तिच्या तीन वर्षांच्या बाळासह वाचवले होते. देशातील एकूण 22 बालकांना यंदा राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार जाहीर झाले आहेत.

झेनने वाचवले 17 जणांचे प्राण: मुंबईच्या परळ भागातील एका 17 मजली इमारतीच्या 12 व्या मजल्यावर 22 ऑगस्ट 2018 रोजी आग लागली होती. याच इमारतीत 16 व्या मजल्यावर राहणाऱ्या झेनने आईवडिलांना उठवले तेव्हा घरात सगळीकडे धूर पसरला होता. झेन बाहेरच्या परिसरात गेली तेव्हा तिला मदतीसाठी अनेकांचे आवाज ऐकू येऊ लागले. प्रसंगावधान राखून तिने तातडीने इमारतीला विद्युत पुरवठा करणारा मेन स्वीच बंद केला आणि अग्निशमन दलाला फोन केला आणि इमारतीतील लोकांना घेऊन ती सुरक्षित ठिकाणी गेली. शाळेमध्ये आगीपासून बचाव कसा करायचा याबाबत दिलेल्या प्रात्यक्षिकासह प्रशिक्षणाचा वापर करून झेनने हे शौर्य दाखवले.


आकाशने बुडणाऱ्या मायलेकींना वाचवले: औरंगाबाद जिल्ह्यातील हातमाळी गावचा रहिवासी असलेला पंधरा वर्षीय आकाश खिल्लारे शाळेत जात होता. दुधना नदीच्या पुलावरून जात असताना त्याला नदीत एक महिला बुडताना दिसली. आजूबाजूला मदत करणारे कोणीचे दिसत नसल्याने त्याने स्कूलबॅग बाजूला ठेऊन70 फूट उंच पुलावरून नदीत उडी मारली. पोहत पोहत तो महिलेजवळ पोहोचला. तेव्हा तिच्यासोबत तीन वर्षांचे एक बाळही त्याला दिसले. आकाशने आधी बाळाला बाहेर काढले आणि नंतर महिलेची सुटका केली. नदीत कपडे धूत असताना या महिलेचे बाळ खोल पाण्यात गेले होते. त्याला वाचवण्यासाठी पोहता येत नसतानाही ती नदीत उतरली होती.

No comments:

Post a Comment

Pages