देवणी गोवंश संवर्धनासाठी शंभर एकर जमीन उपलब्ध करणार - पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 11 January 2020

देवणी गोवंश संवर्धनासाठी शंभर एकर जमीन उपलब्ध करणार - पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे

देवणी गोवंश संवर्धनासाठी शंभर एकर जमीन उपलब्ध करणार
 - पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे


जळकोट येथील कालवा दुरूस्ती साठी 1 कोटी 20 लाखाचा निधी..
हत्तीबेट ब दर्जा पर्यटनस्थळ म्हणून मान्यता देणार..
उदगीर येथे अप्पर पोलीस अधीक्षक व आर टी ओ कार्यलयासाठी प्रयत्न करणार..


लातूर : देवणी गोवंश हे आपले भूषण असून 1952 पासून 27 वेळा देवणी गोवंशाला पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. या भागातील शेतकरी पशुधनाचा चांगला  संभाळ करतात, शासनाकडूनही यासाठी मदत केली जाणार आहे. तसेच येथील पशुवैद्यकीय कॉलेज परिसरातील शंभर एकर जमिन देवणी गोवंश ब्रीड संवर्धन करण्यासाठी उपलब्ध केली जाईल,  अशी माहिती पर्यावरण, सार्वजनिक बांधकाम, पाणी पुरवठा, भूकंप पुनर्वसन राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली.

उदगीर येथील जिल्हा परिषदेच्या मैदानावर आयोजित पशुपक्षी व कृषि प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी पर्यावरण राज्यमंत्री बनसोडे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे, जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती बजरंग जाधव, उदगीर पंचायत समिती सभापती विजयकुमार पाटील, नगराध्यक्ष बसवराज बागबंदे, बसवराज पाटील नागराळकर ,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी श्री. बोधनकर, तहसिलदार व्यंकटेश मुंढे, यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

 पर्यावरण राज्यमंत्री बनसोडे पुढे म्हणाले, की देवणी गोवंश हे आपले भूषण आहे या गोवंशाचे संवर्धन होण्यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न केले जात असून यासाठी पशु महाविद्यालय परिसरातील 100 एकर जमीन तर शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

उदगीर येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व अतिरिक्त पोलीस अधीक्षक कार्यालय ची निर्मिती केली जाणार असून तालुका क्रीडा संकुलासाठी 15 कोटीचा निधी मंजूर करण्यात आल्याचे माहिती श्री. बनसोडे यांनी दिली. त्याप्रमाणेच एमआयडीसीसाठी जमीन उपलब्ध करून देण्याचे काम प्रगतीपथावर असून लवकरच हा प्रश्न सोडविला जाऊन या भागाचा औद्योगिक विकास होण्यास मदत होईल असे  त्यांनी म्हटले.

जळकोट तालुक्यातील कालवा दुरुस्तीसाठी एक कोटी 20 लाखाचा निधी मंजूर करण्यात आलेला असून या कालव्याची दुरुस्ती झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. त्याप्रमाणेच हत्तीबेट पर्यटन स्थळाला ब दर्जा देण्यात येणार असल्याचे सांगून उदगीर व जळकोट तालुक्यातील इतर काही महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यात येणार असल्याची माहिती श्री बनसोडे यांनी देऊन गुरु हावगीस्वामी यांच्या मठाला ही पर्यटन स्थळाचा दर्जा दिला जाईल असे त्यांनी सांगितले.

उदगीर जळकोट विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी मतदारसंघाच्या विकासासाठी सूचना द्याव्यात, त्या सूचनांची  गांभीर्याने दखल घेतली जाईल असे श्री बनसोडे यांनी सांगून उदगीर जळकोट तालुक्याच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नसल्याची ग्वाही ही त्यांनी दिली.

  गुरू हावगीस्वामी यात्रेनिमित्त आयोजित पशु-पक्षी व कृषी  प्रदर्शन हे पुढील वर्षापासून अखिल भारतीय स्तरावर चे प्रदर्शन म्हणून भरविले जाईल त्यासाठी निधीची कोणतीही कमतरता राहणार नाही अशी ग्वाही जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी दिली. यावेळी कृषी सभापती बजरंग जाधव यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
     प्रारंभी पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते गुरू हावगीस्वामी यात्रेनिमित्त आयोजित पशुपक्षी व कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन फीत कापून तसेच गोवंशाचे  पूजन करून करण्यात आले. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी श्री बोधनकर यांनी  कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून आयोजनाचा उद्देश सांगितला तर तालुका पशुधन विकास अधिकारी सतिष केंद्रे यांनी मान्यवरांचे   आभार मानले.  पशुपक्षी व कृषी प्रदर्शनास उदगीर व  जळकोट तालुक्यातील व परिसरातील शेतकऱ्यांनी आपले पशू प्रदर्शनात आणलेले होते. त्याप्रमाणेच कृषी संबंधित विविध स्टॉल येथे थाटण्यात आले होते. या प्रदर्शनात परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

No comments:

Post a Comment

Pages