भारताच्या 'बुद्ध'धम्माने मिळते श्रीलंकेत सन्मानाचे जीवन.. बावरीनगर धम्मपरिषदेत "भदंत दोडंगपहाल सुगूण महाथेरो" यांचा कृतज्ञभाव
मंगलमय वातावरणात धम्मपरिषदेची सुरुवात
नांदेड : बौद्ध धम्म हा मुळात तुम्हा भारतीयांचा 'धम्म' आहे. तथागत भगवान बुद्धाने दिलेला बौद्ध धम्म आज जगात अनेक देशात विस्तारतो आहे. थोर धर्मप्रचारक राजा सम्राट अशोक यांचे सुपुत्र महेंद्र यांनी पोहोचवलेल्या बौद्ध धम्माने श्रीलंकेमध्ये आज आम्हाला सन्मानाचे जीवन मिळाले आहे, असा कृतज्ञभाव श्रीलंका येथून आलेले ज्येष्ठ बौद्ध भिक्खू भदंत दोडंगपहाल सुगूण महाथेरो यांनी व्यक्त केला.
तीर्थक्षेत्र महाविहार बावरीनगर दाभड येथे आजपासून सुरु झालेल्या ३३ व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे धम्म ध्वजारोहण भदन्त दोडंगपहाल सुगूण महाथेरो यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी धम्मदेसना देताना ते बोलत होते. भारतामध्ये धम्माचरण करणारे उपासक घडविण्यासाठी श्रीलंकेतील आमचा बौद्ध भिक्खू संघ पुढाकार घेण्यास उत्सुक आहे, अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली. धम्म ध्वजारोहण कार्यक्रमाला पूज्य भदंत धम्मसेवकजी महाथेरो यांची उपस्थिती होती.
नेपाळ येथून आलेले पूज्य भदंत उदयभद्र थेरो, भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो, भदंत सदानंद, भदंत सत्यपाल थेरो, भदंत विनय बोधी प्रिय थेरो, धम्म परिषदेचे मुख्य संयोजक महाउपासक डॉ. एस. पी. गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी धम्मदेसना देताना भदन्त दोडंगपहाल सुगूण महाथेरो पुढे म्हणाले की, तीर्थक्षेत्र महाविहार बावरीनगर दाभड येथे भेट देण्याची ही माझी दुसरी वेळ आहे. यापूर्वी भारतामध्ये माझे नऊ वेळा येणे झाले आहे. तथागताच्या जन्मामुळे भारतभूमी ही नेहमीच बौद्ध अनुयायींसाठी आकर्षण राहिली आहे. बौद्ध धम्माच्या प्रचार-प्रसारासाठी, आचरणशील समाज घडविण्यासाठी अजूनही खूप काही करावे लागणार आहे. भारतातील बौद्धगया हे पवित्र स्थळ आजही अन्य धर्मियांच्या ताब्यात आहे. 'बौद्धगया' भारतीय बौद्धांच्या अधिपत्याखाली येण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
भगवान बुद्ध ही दिसण्या - पाहण्याची गोष्ट नाही. उपासक तसेच तरुण भिक्खूंनी ध्यानाच्या अनुभूतीतून बुद्ध जाणून घ्यावा, असाही धम्मोपदेश ह्यावेळी भदन्त दोडंगपहाल सुगूण महाथेरो यांनी केला. प्रा. मिलिंद भालेराव यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केले.
लक्षवेधी बौद्ध धम्म फेरी
शहरातील महात्मा ज्योतिराव फुले पुतळ्याला अभिवादन करून दुपारी २ वाजता वजीराबाद चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्गे महाविहार बावरीनगरकडे धम्म फेरीचे काढण्यात आली. धम्म फेरीमध्ये पीपल्स एज्युकेशन सोसायटी संचलित नांदेड येथील नागसेन हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे लेझीम पथक सहभागी झाले. काषाय वस्त्र परिधान केलेला भिक्खू संघ आणि शुभ्र वस्त्र परिधान केलेल्या उपासकांनी या फेरीमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले .
No comments:
Post a Comment