तीर्थक्षेत्र महाविहार बावरीनगर येथे उद्या पासून ३३ वी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 9 January 2020

तीर्थक्षेत्र महाविहार बावरीनगर येथे उद्या पासून ३३ वी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद


तीर्थक्षेत्र महाविहार बावरीनगर येथे उद्या पासून ३३ वी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद


नांदेड : येथून जवळच असलेल्या अर्धापूर तालुक्यातील दाभड येथे तीर्थक्षेत्र महाविहार बावरीनगरच्या 33 व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेला उद्या (दि. १० ) पासून सुरुवात होणार आहे. सलग दोन दिवस चालणाऱ्या आणि देश-विदेशात 'आदर्श' गणल्या गेलेल्या या अखिल भारतीय बौद्ध धर्म परिषदेत देश-विदेशातील विद्वान भिख्खूगण उपस्थित राहणार आहेत. तीर्थक्षेत्र महाविहार बावरीनगर अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद तीर्थक्षेत्र विकास सुकाणू समितीचे कार्यकारी अध्यक्ष तथा मुख्य संयोजक महा उपासक डॉ. एस. पी. गायकवाड यांनी ही माहिती दिली.

भारतीय बौद्ध ज्ञानालंकार शिक्षण संस्था मुळावा च्या वतीने 1988 साली दाभड येथे पहिली अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद घेण्यात आली होती. पूज्य भदंत धम्मसेवकजी महाथेरो या परिषदेचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत.

दिनांक 10 जानेवारी रोजी सकाळी ५.३० वाजता त्रिरत्न वंदना परित्राण पाठ आणि सकाळी ८:३० वाजता महाबोधी वंदनेने परिषदेचा प्रारंभ होणार आहे. श्रीलंका येथील पूज्य भदंत सद्धालोका महाथेरो यांच्या हस्ते सकाळी ९:३० वाजता अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेत धम्म ध्वजारोहण करण्यात येईल. बौद्ध उपासकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन बौद्ध ज्ञानालंकार संस्थेतर्फे करण्यात आली आहे.

तीर्थक्षेत्र महाविहार बावरीनगर दाभड बौद्ध धम्म परिषदेच्या निमित्ताने नांदेड शहरातून फेरी फेरी काढण्यात येणार आहे. शहरातील महात्मा ज्योतिराव फुले पुतळ्याला अभिवादन करून दुपारी २ वाजता वजीराबाद चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्गे महाविहार बावरीनगरकडे धम्म फेरीचे प्रस्थान होईल. धम्म फेरीमध्ये पीपल्स एज्युकेशन सोसायटी संचलित नांदेड येथील नागसेन हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे लेझीम पथक सहभागी होणार आहे. दुपारी ४ वाजता धम्म फेरी तिर्थक्षेत्र महाविहार बावरीनगर येथे पोहोचेल.

मुख्य उद्घाटन सोहळा

 श्रीलंका येथील पूज्य भदंत दोडंगपहाल सुगूण महाथेरो यांच्या हस्ते अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचा उद्घाटन सोहळा होणार आहे. संध्याकाळी ७ वाजता होणाऱ्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी पूज्य भदंत धम्मसेवकजी महाथेरो राहणार आहेत. देश-विदेशातून उपस्थित पूजनीय भिक्खू संघाचे यावेळी संयोजकांतर्फे स्वागत करण्यात येईल. नेपाळ येथील पूज्य भदंत उदयभद्र थेरो यांच्या हस्ते "संबोधी 2020" या स्मरणिकेचे प्रकाशन होईल. त्यानंतर भिख्खू संघाची धम्मदेसना होणार आहे.'बौद्ध जीवन मार्ग', 'जातक कथाएँ एवंम् बौद्ध धम्म' या विषयावर उपासकांना भिख्खू संघाकडून यावेळी धम्मोपदेश केला जाईल.

धम्म परिषदेच्या दुसऱ्या दिवशी ११ जानेवारी रोजी धम्मदेसना, सामूहिक मंगल परिणय सोहळा, व्यसनमुक्ती प्रतिज्ञा, धम्म चाचणी स्पर्धा पुरस्कार वितरण, आनापान सती आदी भरगच्च कार्यक्रम होतील. परिषदेचे अध्यक्ष पूज्य भदंत धम्मसेवकजी महाथेरो यांच्या धम्मदेसनेने या परिषदेची सांगता होणार आहे.

No comments:

Post a Comment

Pages