- Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 20 January 2020

श्रद्धा आणि सबुरी चा तंटा

गत आठवड्याभरापासून राज्यात नव्या वादाला तोंड फुटले असून, साईसमाधी शताब्दी सोहळ्यात राष्ट्रपतींनी साईबाबांच्या जन्मस्थळाचा उल्लेख केला होता. लागलीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा जन्मस्थळाचा उल्लेख केल्याने यावर साईभक्त आणि शिर्डीकरांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली. मुळात ज्या साईबाबांनी समस्त जगाला "सबका मालिक एक'' असे शाश्वत ब्रीद दिले असताना पाथरी आणि शिर्डी येथील वाद हा राजकारणातून की अर्थकारणातून होत आहे, हे मात्र कळेनासे झाले आहे.  थोर संत साईबाबांनी सर्वांनी एकत्र राहण्यासाठी अनेक बाबी घडवून आणल्याचे लेखी आणि ग्रंथातून स्पष्ट झाले आहे. तरीसुद्धा केवळ राजकीय गादिची उलथापालथ झाल्याबरोबर भारतीय संस्कृतीचे वैभव असलेल्या साईबाबांच्या जन्मस्थानावरून वाद निर्माण होत आहे. हा वाद संस्थानला मिळत असलेल्या कोट्यवधी  दान तथा निधीचा पाथरी आणि शिर्डी अशा  दोन ठिकाणी विभागल्या जाईल, या भीतीने तर होत नाहीना, हे निक्षून पाहणे गरजेचे आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे, कमलाकर कोते यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय शिर्डीकरांनी दिल्लीत जाऊन थेट राष्ट्रपतींची भेट घेऊन जन्मस्थळाचा खुलासा केला होता. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा जन्मस्थळाचा उल्लेख केल्याने भाविक तसेच शिर्डीकरांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे लक्ष वेधण्यासाठी रविवारपासून  शिर्डी ग्रामस्थांकडून बेमुदत बंदची हाक देण्यात आली आहे. याबाबत शनिवारी ग्रामसभा घेण्यात आली. पाथरीच्या विकासाला विरोध नाही तर मुख्यमंत्र्यांकडून पाथरी ही साईबाबांची जन्मभूमी असल्याचा उल्लेख केला. त्याला विरोध असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. “साईबाबांनी आपल्या हयातीत आपले नाव, गाव, जात, धर्म उघड केले नाही. मुळात संताचे कुळ आणि मूळ विचारू नये, असे म्हटल्या जाते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परभणी जिल्ह्यातील पाथरी गावाचा उल्लेख साईबाबांच्या जन्मस्थळाशी करुन शिर्डीकर आणि भाविकांची नाराजी ओढवून घेतली. केवळ सवंग प्रसिद्धीसाठी आणि व्यवसायिक फायद्यासाठी असा वाद काही जण उपस्थित करत आहेत. बाबांच्या नावावर कोणीही धंदा मांडू नये; अन्यथा शिर्डीकर मोठे आंदोलन उभारुन अशा षडयंत्री लोकांवर कारवाई करण्यासाठी भाग पाडतील”, असा इशारा साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त सचिन तांबे आणि ग्रामस्थांनी दिला आहे. या संदर्भात मात्र संस्थानचे डॉ. सुरेश हावरे यांनी यासंदर्भात मौन पाळल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, पाथरी येथे जन्मभूमीच्या विकासासाठी एक कृती समिती स्थापन करण्यात आली. आमदार बाबाजानी दुर्रानी यांची या कृती समितीच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. साई जन्मभूमी असलेल्या पाथरी या तीर्थक्षेत्राचा विकास करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ९ जानेवारी रोजी औरंगाबाद येथील बैठकीत १०० कोटींच्या विकास आराखड्यास मंजुरी दिल्याचे जाहीर केले होते. या घोषणेनंतर शिर्डी विरुद्ध पाथरी असा वाद निर्माण झाला. पाथरी हे साईबाबांचे जन्मस्थान आहे, असे  मानले जाते.  याठिकाणी  भव्य असे मंदिरही  निर्माण करण्यात आले आहे; मात्र  पाथरी ही  साईबाबांची जन्मभूमी  नसल्याचे  शिर्डी संस्थानच्यावतीने सांगितले जात आहे. पाथरीचा विकास झाल्यानंतर  शिर्डीचे महत्त्व कमी होईल, या कल्पनेमुळे शिर्डीकरांकडून पाथरी ही साईबाबांची जन्मभूमी नसल्याचे विधान करून वाद सुरू करण्यात आला. यावरून आता जगभरातील साईभक्तांनी कोणाशी श्रद्धा आणि कोणाशी सबुरी ठेवावी, या पेचात अडकले आहेत.

           -अविनाश पाईकराव

No comments:

Post a Comment

Pages