पँथर नामदेव ढसाळ: एक आठवण - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 15 January 2020

पँथर नामदेव ढसाळ: एक आठवण


पँथर नामदेव ढसाळ: एक आठवण
     
       पँथर नामदेव ढसाळ पहिल्यांदा कॉलेजात फर्स्टइयरलाच वाचून काढले. आपण दुनियादारीतला श्रेयस तळवलकर नसून फँड्रीतला जब्या माने आहोत, आपलं जग वेगळंय हे त्या आधीच कन्फर्म झालेलं. ज्या तारुण्यसुलभ वयात प्रस्थापित सौंदर्यशास्त्रच्या चष्म्यातून आपल्या आजूबाजूला पाहायचं असतं त्या वयात नामदेव ढसाळांनी गोलपीठा, कामठीपुरा आणी गांडूबगीचातल्या वंचित, शोषितांचं विदारक, भग्न जग दाखवलं. हे जग इतकं कुढलेलं होतं की कुठल्याही संवेदनशील माणूस त्याला पाहून भयंकर अस्वस्थ होईल. ढसाळ तिथून कायमचा ताबा घेतात डोक्याचा. तिथले खाटीकखाने, रांडवाडे, खुराड्यागत दाटीवाटीने वसलेली बिऱ्हाडं, मेणबत्यांसारखी जळणारी माणसं हे पार जाणिवेनेणिवेत भिडतं.

ढसाळींनी कवितेत उतरवलेलं जग इतर पेठीयअभिजन कवींसारखं कृत्रिम नव्हतं. तिथं ना चंद्र, तारे, फुलं, माझी प्रिये होतं ना एकूणच टिपिकल दृष्ट लागण्या जोगे सारे असल्या आभाळहेपल्या होत्या. ढसाळांच्या कविता एका चंदेरी दुनियेपलीकडंच्या गोलपीठातल्या अंधाऱ्या जगाचा जाहिरनामा होत्या. एक असं जग जिथं माणसांचा फक्त तुकडाभर भाकरी साठी आख्या आयुष्याचा संघर्ष आहे, जिथं आयुष्यापुढं फक्त दारू-मटका-वेश्या-अवैध धंदे हेच ऑप्शन्स आहेत, भारतीय समाजव्यवस्थेच्या शोषणात पिढ्यांनपिढ्या पिचून गेलेला एक वर्ग आहे. ढसाळांच्या कविता ह्याच वर्गाचं जगणं, आन त्यातला सुन्न करणारा आक्रोश मांडतात. तो इतका तीव्रतेने की त्या एका शब्दांनी रांडव मराठी भाषेला सवाष्ण केलं.

ढसाळांच्या कविता मला वयक्तिक पातळीवर पाय जमिनीवर ठेवायला मदत करतात. थोडं यश मिळालं का आपलं जगणं त्यागून आयडेंटिटी लपवून एलिटव्हाईटकॉलर क्लास मध्ये जायची केवलवानी आयटी सेक्टर धडपड कधी मनात येतं नाही. शोषितघटकांच्या जगण्याबद्दलची संवेदनशीलता तितकीचं घट्ट राहते. कारण आपणही कुठल्यातरी त्याचं जगातून आलोय. आपण सुद्धा त्याचं रक्तात पेटलेल्या अगणिती सूर्यांपैकीचं एक आहोत.

- गुनवंत सरपाते, चेन्नई


No comments:

Post a Comment

Pages