प्रतिभावंत चित्रकार प्राचार्य प्रमोद दिवेकर अनंतात विलीन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 16 January 2020

प्रतिभावंत चित्रकार प्राचार्य प्रमोद दिवेकर अनंतात विलीन


प्रतिभावंत चित्रकार प्राचार्य प्रमोद दिवेकर अनंतात विलीन

अजिंठ्याचा रंग आणि रेषांचा वारसा जपणारा कलावंत हरवला - डॉ. गोणारकर

 नांदेड : येथील सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार प्राचार्य प्रमोद दिवेकर यांच्या पार्थिवावर आज नांदेडच्या गोवर्धनघाट स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. प्राचार्य प्रमोद दिवेकर यांचे काल मध्यरात्रीनंतर अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. दिनांक 15 जानेवारी रोजी दुपारी 2 च्या सुमारास हजारोच्या जनसमुदायाने त्यांना अखेरचा निरोप दिला.

 या निरोप प्रसंगी प्राचार्य प्रमोद दिवेकर यांच्या पत्नी प्रज्ञा, सुकन्या सांची आणि साक्षी तसेच मातापित्यां सह नातेवाईकांच्या अश्रूंना बांध फुटला. सुकन्या सांची व साक्षी या भगिनींनी प्राचार्य प्रमोद दिवेकर यांच्या चितेला अग्नी दिला.

 प्राचार्य प्रमोद दिवेकर हे नांदेडच्या एमजीएम फाइन आर्ट महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून काही वर्षे कार्यरत होते. चित्र तसेच शिल्पकलेतील त्यांच्या प्रभुत्वाने त्यांनी अनेक विद्यार्थी घडविले. विशेषतः नवोदित व प्रथितयश लेखकांच्या पुस्तकांना समर्पक मुखपृष्ठ देण्यात त्यांचा हतखंडा होता. मुखपृष्ठ, रेखाचित्रे आणि व्यंगचित्र यामुळे ते महाराष्ट्रभर सुपरिचित होते. केवळ रेषांच्या माध्यमातून अर्थपूर्ण चित्र साकारण्याचे विलक्षण कसब साध्य असलेल्या प्राचार्य प्रमोद दिवेकर यांचा या क्षेत्रातल्या जाणकारांमध्ये प्रचंड आदर होता. विविध वृत्तपत्रांमधून त्यांनी नियमित व्यंगचित्रे दिली आहेत.

- प्रा. डॉ. राजेंद्र गोणारकर -

प्राचार्य प्रमोद दिवेकर हे सर्वांच्या मदतीला धावणारे कलावंत होते. थक्क करून सोडणाऱ्या त्यांच्या वळणदार रंग - रेषा त्यांच्या चित्रकलेतील विलक्षण प्रतिभेच्या साक्ष आहेत. अजिंठ्याच्या रंग आणि रेषांचा वारसा जपणारे ते एक प्रतिभावंत कलावंत होते. तरीसुद्धा त्यांच्या ठाई असलेला विनयभाव हा परमोच्च होता, अशा शब्दांमध्ये डॉ. राजेंद्र गोणारकर यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
--------
 एमजीएम अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. गीता लाठकर, डॉ. जगदीश कदम, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. दु. मो. लोणे, प्रकाशक निर्मलकुमार सूर्यवंशी, दत्ता डांगे शंकर वाडेवाले, चित्रकार नयन बारहाते, प्रकाश येवले, सुनील सोनुले, डॉ. विलासराज भद्रे, डॉ. शेखर घुंगरवार, डॉ. एस. एस. मुनेश्वर, डॉ. कैलास धुळे, शाम निलंगेकर, प्रा. नासीर सर, शिल्पकार प्रा.  व्यंकट पाटील, प्रा. महेश महामुने,  मानव कुंडलवाडीकर, प्रा. महेश मोरे, मिलिंद ढवळे, अशोक एडके, पत्रकार प्रकाश कांबळे, राम तरटे, नंदकुमार कांबळे, कृष्णा उमरीकर, रमेश कदम, प्रा.सुभाष पवार,प्रा.आनंद कदम,मारोती वाघ,डॉ.सुनील जोंधळे,डॉ.गोविंद हंबर्डे, विकास कदम, लक्ष्मण भवरे आदींसह मोठ्या संख्येने जनसमुदाय अंत्यविधीला उपस्थित होता.
__________

No comments:

Post a Comment

Pages