किनवट वनपरिक्षेत्रांतर्गत सिरमेट्टी परिसरात मादी जातीचा बिबट मृत अवस्थेत
किनवट : किनवट वनपरिक्षेत्रांतर्गत सिरमेट्टी (ता.किनवट) नियतक्षेत्रात सोमवारी(दि.६) सकाळी एक मादी जातीचा बिबट मृत अवस्थेत आढळून आला. या बिबट्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे गूढ अजून उलगडले नाही. मात्र, गेल्या चार महिन्यातील बिबट्याच्या मृत्यूची ही दुसरी घटना असल्यामुळे, वनविभाग खडबडून जागे झाले आहे.
सिरमेट्टीच्या जंगलात सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास गुराख्याला गाई चारतांना हा मृत बिबट नजरेस पडला. त्याने ग्रामस्थांना तातडीने माहिती दिल्यानंतर, त्यांनी वनविभागाच्या फिरत्या पथकाला कळविले. वेगात चक्रे हलून वनपरिक्षेत्र अधिकारी के.एन.खंदारे, फिरत्या पथकाचे योगेश शेरेकार, वनपाल सांगळे, गायकवाड, खामकर, चालक आवळे आदींचा ताफा घटनास्थळी पोहोचून त्यांनी पंचनामा केला. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.बिराजदार यांनी आपल्या दोन सहकार्यांसह मृत बिबट्याचे शवविच्छेदन केले. मृत्यूचे कारण कळण्यासाठी त्या बिबट्याचा ‘विसेरा’ (शरीरातील आतील भाग मुख्यत: आतडी) घेऊन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यानंतर वनकर्मचार्यांनी त्या मृत बिबट्याचे दहन केले. चार महिन्यापूर्वी गणेशपूरच्या जंगलातसुद्धा एक बिबट मृत अवस्थेत आढळला. त्याचे गूढ उलगडले नसतांना सिरमेट्टीमध्ये मादी जातीचा बिबट मृत अवस्थेत आढळल्याने, उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. बिबटांचा मृत्यू अपघाताने होतोय की कुणी त्यांचा मारेकरी आहे, हे शोधण्याचे आव्हान आता वनविभागासमोर आहे.
No comments:
Post a Comment