मातंग समाजाचे समाजशास्त्रीय विश्लेषण चळवळीला गतिमान करणारे
- ज.वि.पवार यांचे प्रतिपादनमुंबई : आंबेडकरी चळवळीतील मातंग समाज हा केवळ इतिहास नाही, तर आंबेडकरी चळवळीचा विस्तार करण्यास उपयुक्त व चळवळीला दिशादर्शन करणारा हा महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे. प्रा. सोमनाथ कदम यांनी या ग्रंथाच्या माध्यमातून एक समाजशास्त्रीय विश्लेषण पुढे आणले असून समाजवैज्ञानिकांना आंबेडकरी चळवळीतील मातंग समाज हा ग्रंथ प्रेरणादायी ठरेल, अशी अपेक्षा ज्येष्ठ विचारवंत आणि साहित्यिक ज.वि.पवार यांनी व्यक्त केली.
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या साहित्य अकादमीच्या सभागृहात प्रा. डॉ. सोमनाथ कदम यांच्या 'आंबेडकरी चळवळीतील मातंग समाज', या ग्रंथाचे प्रकाशन ज. वि.पवार यांच्या यांच्या हस्ते नुकतेच झाले. यावेळी ते बोलत होते. लोकवांङॖमय गृह प्रकाशन, मुंबई आणि सम्यक साहित्य संसद , सिंधुदुर्ग यांच्या वतीने या प्रकाशनाचे आयोजन केले होते. फुले-शाहू-आंबेडकर विचारधारा हीच वंचित घटकांसाठी सम्यक विचारधारा असून भविष्यकाळात आंबेडकरी विचारच समाजाला तारणारा असेल, असे स्पष्ट प्रतिपादन पुढे बोलताना ज. वि. पवार यांनी केले.
अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समीक्षक मोतीराम कटारे, तर प्रमुख वक्ते म्हणून आंबेडकरी साहित्यिक प्रा.डॉ.विठ्ठल शिंदे यांची उपस्थिती होती. याप्रसंगी डॉ. श्रीधर पवार, बंडू घोडे, अरविंद सुरवाडे, छाया कोरगावकर, राजकुमार नामवाड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.या निमित्ताने, प्रसंवाद, या वार्षिक अंकाचेही प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी प्रा. डॉ.विठ्ठल शिंदे यांनी आंबेडकरी चळवळ आणि मातंग समाजाच्या वाटचालीवर भाष्य केले. आंबेडकरी चळवळीतील मातंग समाजाच्या सहभागाचे दर्शन प्रा.डॉ. सोमनाथ कदम यांनी या ग्रंथात घडवले असून त्या माध्यमातून बौद्ध व इतर जाती समूहाला अंतर्मुख होऊन आपली भूमिका आणि दिशा तपासण्यास प्रवृत्त केले आहे. समाजात परिवर्तन घडवून आणणे असा या ग्रंथाचा उद्देश असल्याने तो जातिअंताच्या मुद्द्याला जाऊन भिडतो. आंबेडकरवाद हा परिवर्तनाचा पासवर्ड असल्याचे प्रा.सोमनाथ कदम यांनी केलेले विधान हे काळानुरूप महत्त्वाचे दिशादर्शनच म्हटले पाहिजे. अध्यक्षीय मार्गदर्शन करताना मोतीराम कटारे यांनी सद्यकालीन भारताच्या नागरिकत्वाच्या मुद्द्याकडे उपस्थितांचे लक्ष वेधले.
या प्रकाशन समारंभाचे प्रास्ताविक सम्यक साहित्य संस्थेचे अध्यक्ष सुनील हेतकर यांनी केले. लोकवाॖङमयग्रॢहाचे प्रकाशक राजन बावडेकर यांनी प्रकाशनांची भूमिका विशद केली. प्रा. डॉ.राज ताडेराव, सिद्धार्थ तांबे, सुचिता गायकवाड ,निकसन कुमठेकर ,एड.बालाजी कांबळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सूत्रबद्ध निवेदन राजेश कदम यांनी तर उपस्थितांचे आभार प्रसंवादचे संपादक अनिल जाधव यांनी मानले. याप्रसंगी ज्येष्ठ कवी शिवा इंगोले, अविनाश गायकवाड ,एस.एस.धुपे ,रमेश सावंत, प्रदीप सर्पे , श्रीमती कुसुम गोपले , जाधव ,प्रा.आनंद देवडेकर, एड.राम चव्हाण,प्रसेनजित,लेखकाचे आई-वडील तथा कार्यकर्ते साहित्यिक व श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment