प्रबुद्ध भारत हे नाव का स्वीकारले ? - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 5 February 2020

प्रबुद्ध भारत हे नाव का स्वीकारले ?





प्रबुद्ध भारत हे नाव का स्वीकारले ?


भारतरत्न संपादक डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या पत्रकारितेची सुरुवात मूकनायक पासून केली ... ३१ जानेवारी १९२० रोजी त्यांनी मुकनायकची सुरुवात केली ... त्यांचवेळी बाबासाहेब सिडने ह्याम कॉलेज मध्ये प्राध्यापक होते त्यामुळं मुकनायकचं संपादक पद त्यांनी पांडुरंग नंदराम भटकर यांच्याकडे दिलं ... ५ जुलै १९२० रोजी उर्वरित अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी बाबासाहेब लंडनला गेले ...
जानेवारी ते जुलै १९२० या सुमारे पाच महिने २५ दिवस बाबासाहेब मुकनायकचं स्वतः काम पहात होते ...स्फुट , अग्रलेख लिहीत होते ...त्यांनी या काळात १४ लेख लिहिल्याची नोंद सापडते ...मूकनायक बंद पडल्यानंतर त्यांनी ३ एप्रिल १९२७ रोजी " बहिष्कृत भारत " हे पाक्षिक सुरू केलं ... मूकनायक सुरू करताना मूक समाजाचं नेतृत्व बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारलं होतं ... अन " त्यांच्या लेखनातील शब्दा सवे मुके बोलू लागले ..." तसे बाबासाहेबांनी भारतातील बहिष्कृतांच्या वेदनेला वाचा फोडण्याचं काम बहिष्कृत भारत च्या माध्यमातून केलं ...
त्यानंतर बहिष्कृत भारत ही आर्थिक विवंचनेमुळं बंद पडला...पण बहिष्कृत भारतातील जनतेचे प्रश्न जगाच्या वेशीवर मंडण्याची त्यांना नितांत गरज वाटू लागली ...त्याच गरजेतून त्यांनी २४ नोव्हेंबर १९३० रोजी " जनता " पाक्षिकाचा पहिला अंक प्रकाशित केला ... बहिष्कृत भारतातील जनतेचा आवाज जनता मुळं बुलंद झाला ... विशेष म्हणजे जनता २५ ते ३० वर्ष सुरू होता ... दरम्यानच्या काळात बाबासाहेबांनी जनता पशिकाचे ३१ ऑक्टोबर १९३१ पासून साप्ताहिकात रूपांतर केलं ...मराठी बरोबर इंग्रजीत " The People " असे शीर्षक लिहिले जात असे ...दादर येथून त्याचं प्रकाशन होतं असे ...
बाबासाहेबांनी १९३५ मध्ये नाशिक मधील येवला येथे धर्मांतराची घोषणा केली होती ... तेव्हा पासून किंवा त्या अगोदर पासून ते विविध धर्मांचा अभ्यास करत होते ... विविध धर्मातील लोक त्यांना आपल्या धर्माचा बाबासाहेबांनी स्वीकार करावा म्हणून मनधरणी करत होते ... पण बाबासाहेबांच्या मनात कोणत्या धर्माच्या तत्वांचा विचार चालू होता हे त्यांनी काही ठिकाणी नकळत व्यक्त केले होते ... तो धर्म म्हणजे बौद्ध धम्म ... १४ ऑक्टोबर १९५६ रोजी अशोक विजया दशमी दिनी धमीधर्मांतर करण्याची तारीख निश्चित झाली तसे ...
बाबासाहेबांनी ४ फेब्रुवारी १९५६ रोजी जनता साप्ताहिकाचे नामांतर " प्रबुद्ध भारत " असे केले ...आजच्या दिवशी या नामांतरास ६४ वर्ष झाली आहेत ... ६ डिसेंम्बर १९५६ रोजी बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले ... त्यानंतर प्रबुद्ध भारताच्या संगोपनासाठी संपादक मंडळांची नियुक्ती करण्यात आली ... त्या संपादक मंडळात संपादक म्हणून भय्यासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर , मुकुंदराव आंबेडकर , दा . ता . रुपवते ( दादासाहेब ) , शंकरराव खरात ,आणि भा . र . कद्रेकर यांचा समावेश होता ...३ ऑक्टोबर १९५७ रोजी रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाली त्यानंतर प्रबुद्ध भारत रिपब्लिकन पक्षाचे मुखपत्र बनले ... परंतु हे प्रबुद्ध भारत साप्ताहिक १९६१ रोजी बंद पडले ...
तसे पाहिलं तर मूकनायक ते प्रबुद्ध भारत हा बाबासाहेबांच्या पत्रकारितेचा प्रवास म्हणजे त्यांच्या सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय आणि प्रबोधनाच्या जीवनाचा प्रवास होय ... कारण अस्पृश्याच्या चळवळीच्या इतिहासातील हा कालखंड सुवर्ण अक्षरांनी लिहिण्या सारखा आहे ... बाबासाहेबांनी अहोरात्र अस्पृश्याच्या दस्यमुक्तीसाठी केलेल्या रक्तहीन क्रांतीचा हा कालखंड साक्षीदार होता ... त्यांच्या अनेक नोंदी बाबासाहेबांच्या या वृत्तपत्रांनी घेतल्या ... याशिवाय या वृत्तपत्रांनी या कालखंडातील विविध चळवळी , घडणाऱ्या घटना आणि घडामोडी यांच्याही सुज्ञापणे नोंद घेतली ...
परंपरागत समाजस्थितीशी तडजोड न करता सअंजस्थितीत आमूलाग्र बदल करण्याची " भीम प्रतिज्ञा " घेतलेल्या बाबासाहेबांनी या वृत्तपत्रातून अज्ञान , अंधारात चाचपडणाऱ्या , आत्मविश्वास हिरावून घेतलेल्या समाजाच्या मनावर विचारांची मशागत करून क्रांतीची पेरणी केली ...या समाजाला नवे आत्मभान , नवी अस्मिता , नवी दृष्टी आणि नवा आशय दिला ...आजच्या प्रबुद्ध भारत दिनी त्यांच्या पत्रकारितेस आणि त्यांच्या लेखणीस कोटी - कोटी वंदन ...
यशवंत भंडारे ,
लातूर

No comments:

Post a Comment

Pages