रेशीम बाग मैदानावर भीम आर्मीचा मेळावा; आर्मी प्रमुख अॅड.चंद्रशेखर आझाद करणार मार्गदर्शन. - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 21 February 2020

रेशीम बाग मैदानावर भीम आर्मीचा मेळावा; आर्मी प्रमुख अॅड.चंद्रशेखर आझाद करणार मार्गदर्शन.

रेशीम बाग मैदानावर भीम आर्मीचा मेळावा;
 आर्मी प्रमुख अॅड.चंद्रशेखर आझाद करणार मार्गदर्शन.
नागपूरः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालयापासून जवळच असलेल्या रेशीम बाग मैदानावरच भीम आर्मीला मेळावा घेण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिली आहे. उद्या २२ फेब्रुवारीला भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्या उपस्थितीत हा मेळावा होणार आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भीम आर्मी यांची विचारधारा जुळत नसल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे कारण देत रेशीम बाग मैदानावर भीम आर्मीला कार्यकर्ता मेळावा घेण्यास नागपूरच्या कोतवाली पोलिसांनी परवानगी नाकारली होती. तसे शपथपत्रही कोतवाली पोलिसांनी खंडपीठात दाखल केले होते. पोलिसांच्या या निर्णयाला भीम आर्मीने नागपूर खंडपीठात आव्हान दिले होते.

एखाद्या विशिष्ट संघटनेचे मुख्यालय शेजारी आहे म्हणून मेळाव्याला परवानगी नाकारणे संविधानाच्या चौकटीत बसणारे नाही. भीम आर्मीच्या मेळाव्यास नागपूर शहरात इतर ठिकाणी परवानगी देण्यास पोलिस तयार आहेत, मग त्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही का? असा सवाल करत पोलिसांनी परवानगी नाकारण्यासाठी ठोस कारणच दिले नसल्याचा युक्तिवाद भीम आर्मीच्या वतीने ऍड. फिरदोस मिर्झा यांनी खंडपीठात केला. काल गुरूवारी या याचिकेवर सुनावणी झाल्यानंतर खंडपीठाने आपला निर्णय राखून ठेवला होता. आज, शुक्रवारी या याचिकेवर पुन्हा सुनावणी झाल्यानंतर न्या. सुनिल शुक्रे आणि न्या. जे. जामदार यांच्या खंडपीठाने भीम आर्मीच्या मेळाव्यास सशर्त परवानगी दिली.

रेशीम बाग मैदानावर कार्यकर्ता मेळावाच होईल, त्याचे निदर्शने अथवा आंदोलनात रूपांतर होणार नाही. सामाजिक तेढ निर्माण होईल, अशी जातीय, धार्मिक किंवा चिथावणीखोर वक्तव्ये मेळाव्यात करू नये. दुपारी २ ते ५ या वेळातच रेशीम बाग मैदानावर मेळावा होईल, सायंकाळी ६ वाजता संपूर्ण मैदान रिकामे करावे लागेल, या अटींचे पालन होईल, अशी लेखी हमी भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी उच्च न्यायालयाच्या निबंधकांकडे द्यावी, अशा अटी नागपूर खंडपीठाने घातल्या आहेत.

No comments:

Post a Comment

Pages