जरा मी श्वास घेतो तर सजा देऊ म्हणाले ते तिथे मग राहण्याचा कर सदा घेऊ म्हणाले ते ----"धम्म परिषदेत कविसंमेलन रंगले.." - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday, 23 February 2020

जरा मी श्वास घेतो तर सजा देऊ म्हणाले ते तिथे मग राहण्याचा कर सदा घेऊ म्हणाले ते ----"धम्म परिषदेत कविसंमेलन रंगले.."

जरा मी श्वास घेतो तर सजा देऊ म्हणाले ते
तिथे मग राहण्याचा कर सदा घेऊ म्हणाले ते
-----------------------------------
"धम्म परिषदेत कविसंमेलन रंगले.."
_______________________

किनवट : दहाव्या जागतिक बौद्ध धम्म परिषदेनिमित्त बुद्धमूर्ती परिसर, समता नगर येथे आंबेडकरी विचारांचा जागर करणारे कविसंमेलन शनिवारी(दि.२२) रात्री चांगलेच रंगले. कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध साहित्यिक रमेश सरकाटे होते, तर मधु बावलकर, प्रशांत वंजारे, सदानंद सपकाळे, रमेश मुनेश्वर, गंगाधर ढवळे, महेंद्र नरवाडे, किरण पतंगे यासह अनेक कवी कवी संमेलनात सहभागी झाले होते.

कवी संमेलनाध्यक्ष रमेश सरकाटे यांनी देशातील सद्य परिस्थितीवर बहारदार रचना सादर केली..
"जरा मी श्वास घेतो तर सजा देऊ म्हणाले ते
तिथे मग राहण्याचा कर सदा घेऊ म्हणाले ते"

प्रसिद्ध गझलकार मधु बावलकर यांनी गझल सादर करून श्रोत्यांची वाहवा मिळवली..
"माणसाला जोडण्या ला करतो मी जयभीम
सन्मार्ग चालण्याला वाटतो मी जयभीम
वाटते चालताना खोटारडे मिळाले
त्या सांगण्याला करतो मी जयभिम"

आंबेडकरी साहित्य संसदेचे प्रशांत वंजारे यांनी सुंदर रचना सादर केली..
"सिद्धार्था आभाळाच्या व्यापक त्याचे संदर्भ
गळून पडतात तुझ्यापुढे
तुझ्यापुढे सागराची गहनता वाटते अतिसूक्ष्म
चंद्राच्या शीतलतेने तुझं नाव धारण करून फिरावं
आनंदातिरेकान मिरवावं पोर्णिमेच्या चंद्राच रूप घेऊन
सांगावं दुनियेला मीच बुद्ध आहे म्हणून"

अक्षरोदय साहित्य मंडळाचे सदानंद सपकाळे यांनी वास्तव चित्र कवितेतून मांडले..
"भारताचे संविधान लिहिणाऱ्या
बाबासाहेबांनी फाडावे संविधानाचे पान
नाहीतर खोडावे ते कलम पाच
आणि सांगावे की हा देश तुमचा नाही"

क्रांतीसुर्य प्रतिष्ठानचे रमेश मुनेश्वर यांनी संविधानाचे महत्त्व सांगणारी रचना सादर केली..
"जिथे बोलण्यासाठी आम्हा होती बंधी
जिथे लिहिण्यास आम्हा होती बंधी
तुझ्या 'स्वातंत्र्य' कलमाने आलो माणसात
तुम्ही दाविला आम्हास नवा राजपथ"

प्रा. गजानन सोनोणे यांनी कविता गेय रचना सादर केली..
"दुःख वेचता वेचता मी बुद्ध झालो
काया वाचा मनाने मी शुद्ध झालो
सत्याच्या मार्गावरून चालताना
भीमा तुझ्यामुळे मी प्रबुद्ध झालो"

सांगावाकार महेंद्र नरवाडे यांनी गेय कविता सादर करून दाद मिळविली..
"घटनेच्या पानातून प्रतिष्ठा ही मिळताना
रूढीवादी ग्रंथ आज चाळता कशाला"

प्रा. डॉ. हेमंत सोनकांबळे यांनी मार्मिक रचना सादर केली..
"मित्रा सत्या पुढे शहाणपण चालत नाही
असे सांगणारे लाचार भाडेकरू तुला खूप भेटतील
तरीही सत्तेपेक्षा सत्यावरच ठेव अधिक विश्वास"

किरण पतंगे यांनी गेय कविता केली..
"नीती पळाली धर्म बुडाला
पुररक्ताचा निष्पाप चालला
कुबेर कन्या झाली बावरी वाटून या व्यापारी"

काव्यपौर्णिमेचे संकल्पक गंगाधर ढवळे यांनी रमाई विषयी गेय कविता तर प्रा. वासुदेव शेंद्रे यांनी व्यंगात्मक कविता सादर करून वाहवा मिळवली. याबरोबरच माधव वाघमारे, लक्ष्मण भवरे, नागसेन कांबळे, शेषराव धांडे, राजा तामगाडगे, सुनील कांबळे आधी कवींनी प्रबोधनात्मक रचना सादर केले. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन सज्जन बरडे यांनी केले, तर आभार राजेश पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आयोजक राजू शेळके, अध्यक्ष अभय नगराळे, निमंत्रक राजू कांबळे, संयोजक राहुल कापसे आदींनी परिश्रम घेतले. कविसंमेलनात बहुसंख्य रसिक श्रोते होते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages