प्रबुद्ध भारताच्या निर्मितीशिवाय संविधाननिष्ठ राजकारण शक्य नाही! - डॉ. राजेंद्र गोणारकर - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 28 February 2020

प्रबुद्ध भारताच्या निर्मितीशिवाय संविधाननिष्ठ राजकारण शक्य नाही! - डॉ. राजेंद्र गोणारकर

प्रबुद्ध भारताच्या निर्मितीशिवाय संविधाननिष्ठ राजकारण शक्य नाही!


धम्म परिषदेतील परिसंवादातील मान्यवरांचा सूर ;प्रा. डॉ. राजेंद्र गोणारकर,प्रा.डाॅ. मायादेवी वाघमारे,
 प्रा. सत्तेश्वर मोरे यांची उपस्थिती




किनवट : देशात जात आणि धर्माचे प्राबल्य वाढले असून धर्मनिरपेक्ष म्हणवल्या गेलेल्या लोकशाहीतील हरेक माणूस आपापल्या धर्माचा झेंडा घेऊन रस्त्यावर उतरु लागला आहे. संविधानाच्या मूल्याधारित राजकारण या देशात सुरु करायचे असेल तर प्रबुद्ध भारताच्या निर्मितीशिवाय संविधाननिष्ठ राजकारण शक्य नाही, असे प्रतिपादन येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ माध्यमशास्र संकुलाचे प्राध्यापक डॉ. राजेंद्र गोणारकर यांनी किनवट येथे नुकत्याच झालेल्या जागतिक बौद्ध धम्म परिषदेत केले. अध्यक्षस्थानी अमरावती येथील आंबेडकरी विचारवंत प्रा. सत्तेश्वर मोरे हे होते. यावेळी सहभागी चिंतक म्हणून हैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठाच्या हिंदी विभाग प्रमुख प्रा.डाॅ. मायादेवी वाघमारे या उपस्थित होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून स्वागताध्यक्ष प्राचार्य मोहन मोरे, आम्रपाली खंदारे, अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संसदेचे अध्यक्ष प्रशांत वंजारे, सरचिटणीस गंगाधर ढवळे , अक्षरोदय साहित्य मंडळाचे राज्याध्यक्ष सदानंद सपकाळे  यांची उपस्थिती होती.

          दहाव्या जागतिक बौद्ध धम्म परिषदेचे उद्घाटन पुणे येथील झेन भंते सुदस्सन, भंते हर्षवर्धन यांच्या हस्ते झाले. त्यानंतर घेण्यात आलेल्या धम्म परिषदेच्या चवथ्या सत्रात 'देशात संविधाननिष्ठ राजकारण कसं सुरु होईल?' या विषयावर परिसंवाद घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. मायादेवी वाघमारे सहभागी होतांना म्हणाल्या की, 'या देशात पुरातन काळापासून स्रीयांनी संस्कृतीरक्षण केलेले आहे. जुनाट रुढी परंपरा चिकटून राहून त्या जिवंत ठेवण्याचे काम स्रियांनी केले. तोपर्यंत स्रिया अशा व्रत वैकल्ये, उपास तापास, अंधश्रद्धा, रुढी परंपरांची बंधनं झुगारुन दिल्याशिवाय विज्ञाननिष्ठ पिढी तयार होणार नाही, त्यामुळे संविधाननिष्ठ राजकारण सुरू होणार नाही. यासाठी अभ्यासू आणि विचारवंत स्रियांनी पुढे आले पाहिजे'
    अध्यक्षीय समारोप करतांना प्रा. सत्तेश्वर मोरे म्हणाले की, 'संविधानविरोधी कारवायांनी ऊच्छाद मांडलेला आहे. देशात माणसाच्या अस्तित्वालाच आव्हान दिले जात आहे. संसदेत अनेक असे निर्णय घेतले जात आहेत की त्याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे आणि अराजक निर्माण होत आहे. संविधाननिष्ठ माणूस संसदेत गेल्याशिवाय देशाच्या राजकारणाला खऱ्या अर्थानं सुरुवात होणार नाही' .     प्रास्ताविक प्रशांत वंजारे यांनी केले. परिसंवादाचे सूत्रसंचालन गंगाधर ढवळे यांनी केले ,तर आभार प्रा.सुबोध सर्पे यांनी मानले.
   या परिसंवाद कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सज्जन बरडे, रमेश मुनेश्वर, किरण पतंगे, राजा तामगाडगे ,राहुल चौदंते,
डॉ. यु. बी. मोरे, पुंडलिक मुनेश्वर, मिलिंद कांबळे, राम भरणे, किशन ठमके, सुभाष कांबळे, सखाराम घुले, डॉ. अर्जून चव्हाण, अरुण मनवर, किरण कानिंदे, अनिल भवरे, ज्ञानेश्वर मेश्राम, शेखर मुंडे, दिपक देवतळे, अंबादास भगत, किरण पुनवटकर, मज़हर चाऊस, शोएब रहेमान, ज़ाएद खान, बाळू बनसोडे, राहुल कदम, अजय पाटील ,अमोल शेंद्रे आदींनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Pages