संचारबंदीची कठोर अंमलबजावणी पोलिसांना संपूर्ण स्वातंत्र्य; नागरिकांनी घरी बसून सहकार्य करावे - उपमुख्यमंत्री अजित पवार - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 24 March 2020

संचारबंदीची कठोर अंमलबजावणी पोलिसांना संपूर्ण स्वातंत्र्य; नागरिकांनी घरी बसून सहकार्य करावे - उपमुख्यमंत्री अजित पवार

संचारबंदीची कठोर अंमलबजावणी पोलिसांना संपूर्ण स्वातंत्र्य; नागरिकांनी घरी बसून सहकार्य करावे - उपमुख्यमंत्री अजित पवार






मुंबई : ‘कोरोना’ संसर्ग प्रतिबंधासाठी लागू केलेल्या राज्य प्रवेशबंदी, जिल्हा प्रवेशबंदी आणि संचारबंदीसारख्या निर्णयांची अंमलबजावणी राज्यात कठोरपणे करण्यात येईल, त्यासाठी पोलिसांना कारवाईचे संपूर्ण स्वातंत्र्य देण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. भाजीपाला, फळे, दूध, अन्नधान्य आदी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कायमस्वरुपी सुरळीत ठेवण्यात येणार असल्याने नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी करु नये. ‘कोरोना’च्या धोक्यापासून दूर राहण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची स्वत:ची असून त्याप्रमाणे त्यांनी वर्तन ठेवावे, असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.
   राज्यात संचारबंदी लागू असतानाही काही नागरिकांकडून बाजारात खरेदीसाठी गर्दी केली जात आहे. नागरिक अकारण गाड्या घेऊन रस्त्यावर उतरत आहेत. ‘कोरोना’च्या संसर्गाचा धोका वाढत आहे. राज्य शासनाचा आरोग्य विभाग, पोलिस विभाग, महापालिका, नगरपालिकांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे, प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी सर्वजण जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य पार पाडत आहेत. राज्याच्या प्रत्येक घरातला माणूस ‘कोरोना’च्या संसर्गापासून मुक्त राहावा यासाठी ते धोका पत्करत असताना, जनतेनेही संयम पाळून शासनाच्या प्रयत्नांना साथ द्यावी, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.
   ‘कोरोना’च्या संसर्गापासून स्वत:ला आणि कुटुंबाला वाचवण्याची जबाबदारी आता प्रत्येक नागरिकाची आहे. ‘कोरोना’चे गांभीर्य ओळखून सर्वांनी घरी बसून सहकार्य करावे. सुदैवाने, राज्यातला ‘कोरोना’चा प्रसार अद्याप मर्यादित आहे. काही बाधित व्यक्ती ‘कोरोना’मुक्तही झाल्या आहेत ही चांगली लक्षणे असल्याचे सांगून, ‘कोरोना’विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येकाने घरी बसून योगदान द्यावे, असेही आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages