कोरोणामुळे लोह्यातील पालं झाले लॉकडाऊन भटक्यांनी आता कसे जगावे अन् काय खाऊन? - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 25 March 2020

कोरोणामुळे लोह्यातील पालं झाले लॉकडाऊन भटक्यांनी आता कसे जगावे अन् काय खाऊन?

कोरोणामुळे लोह्यातील पालं झाले लॉकडाऊन
 भटक्यांनी आता कसे जगावे अन्  काय खाऊन?



 लोहा : आज गुढीपाडवा... सर्वत्र आनंदाऐवजी कोरोणाच्या भीतीची दहशत... एरव्ही गजबजलेला लोहा शहर आज लॉकडाऊनमुळे ... निपचित पडलेल्या वस्तू सारखा शांत शांत... एरव्ही धावणारे रस्ते सामसूम... सर्व लोक घरातच.... सामाजिक अंतर ठेवून नेहमी असतात तसेच.... तरीही घरोघर पुरणपोळीचा बेत सर्वसामान्य माणसांच्या घरात.... लोहा शहरात बालाजी मंदिराच्या पाठीमागील भागात शंभर- सव्वाशे भटक्या- विमुक्ताची पालंही आज लॉक डाउन झाली आहेत... कारण  कोरोना महामारीच्या संसर्गापासून वाचण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने लागू केलेल्या लॉकडाउन आणि कर्फ्यूमुळे ज्यांची हातावर पोटे आहेत... त्यांच्यावर घरातच उपाशी बसण्याची वेळ आली आहे.
    लोहा शहरातील या पालवस्तीमध्ये नंदीवाले नाथजोगी, पारधी, मसनजोगी , मांगगारूडी, लवंगी गोसावी, पाथरवट, वैदू आणि कैकाडी जमातीचे लोकं राहतात... सरकारने लॉक डाऊन केले असले तरी... हे लॉक ज्यांच्या घराला दारे आहेत त्यांच्यासाठी आहे.... पण ज्यांना घरेच नाहीत.... त्यांचे काय? मेन कापडाच्या.... पोत्यांच्या पालामध्ये सहा-सातशे माणसं अनेक वर्षांपासून राहतात.


  भंगार वेचून, भिक्षा मागून, मोलमजुरी करून, छोटे-मोठे व्यवसाय करून, हॉटेलवर वेटर राहून ही माणसे आपले पोट भरतात. पण आता करोणा रोगामुळे त्यांच्या पोटावर टाच आली आहे.... कारण दररोज काम करणे आणि भिक्षा मागून संध्याकाळची चूल पेटविणे हीच त्यांची जंगम मालमत्ता.... आज सकाळी दहा वाजता साईनाथ शिंदे, लक्ष्‍मीबाई पारधी भोसले, राजू कांबळे, हरी मामाडगे, चंद्रशेखर राशीवंत आणि अर्जुन नक्कलवाड  यांचा फोन आला..... सर्वांचा सूर एकच ..." सर आम्ही कसं जगावं? आमच्याजवळ पोटाला काहीच नाही? कोणी उधारही देत नाही".... असे उपाशी मरण्यापेक्षा रोगाने मेलेले बरं.... कायमचे या  कटकटीतून सुटाल तरी.... हा काळीज पिळवटून टाकणारा आवाज मी घरी खात असलेला अन्न मला आज गोड लागू देणार नाही..... मी तहसीलदार साहेबांना कॉल केला तर साहेब कॉल घेत नाहीत... मग दाद कोणाला मागायची ? अजून ना त्यांच्यापर्यंत नगरपालिकेचा कर्मचारी गेला ना महसूलचा तलाठी गेला.... मग ही माणसं पोटासाठी रस्त्यावर आली तर याची जबाबदारी कोणाची?..... बिल्डिंग.... सोफिस्टिकेटेड कॉलनीच्या पलीकडेही माझा एक भारत आहे... जो टिचभर पोटासाठी रात्रंदिवस संघर्ष करतो... आज त्याच्यावर प्रगत सिव्हिलायझेशनमुळे एक भयंकर प्रसंग ओढवलेला आहे... या प्रसंगातून त्यांना बाहेर काढण्यासाठी आपल्याला जशी जमते तशी मदत करा ... अशाच अनेक वस्त्या संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या शहरात पसरलेल्या आहेत..... त्यांचेही दुःख असेच आहे.... आज जात -पात, धर्म -पंथ आणि पक्षभेद गळून पडत असताना आपल्या आजूबाजूला अनेक पिचलेली वंचित...उपेक्षित माणसे आहेत त्यांना माणूस म्हणून जगण्यासाठी मदत करा...कारण ती ही माणसे आहेत.... जनावरे नाहीत.... त्यांच्यापर्यंत प्रशासनाने पोहोचावे त्यांना मदत करावी.... एवढेच अपेक्षा।
                                   - डॉ. संजय बालाघाटे

No comments:

Post a Comment

Pages