४४ कलम लागू झाले तरी अत्यावश्यक सेवा दुकाने सुरू राहणार, तेव्हा नागरिकांनी घाबरून जाऊ नये -सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday, 25 March 2020

४४ कलम लागू झाले तरी अत्यावश्यक सेवा दुकाने सुरू राहणार, तेव्हा नागरिकांनी घाबरून जाऊ नये -सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल

१४४ कलम लागू झाले तरी अत्यावश्यक सेवा  दुकाने सुरू राहणार, तेव्हा नागरिकांनी घाबरून जाऊ नये

-सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल





किनवट  :
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी महोदयांनी सुधारित जमावबंदी आदेश लागू केला आहे; परंतु अत्यावश्यक वस्तु,सेवा पुरविणारी दुकाने आस्थापना यांना वरील प्रतिबंधातुन वगळण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता प्रत्येकी ३ फुट सामाजिक अंतर ठेवावे, योग्य ती स्वच्छता सुनिश्चित करावी आणि वारंवार हात धुण्याची व्यवस्था करावी, असे आवाहन उपविभागीय दंडाधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहे.
              महाराष्ट्र शासनाच्या संपूर्ण बंदीबाबतच्या सुधारित अधिसूचनेनुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी फौजदारी प्रक्रीया दंड संहिता १९७३ चे कलम १४४ ( १ ) ( ३ ) अन्वये दिनांक २४ मार्च रात्री ०० . ०० वा . पासुन ते दिनांक ३१ मार्च  मध्यरात्री २४ . ०० वा . पर्यत नामरी ग्रामिण व औद्योगिक क्षेत्रात  जमावबंदी आदेश लागू केला आहे.
               सदर आदेश लागु झाल्यापासून उपरोक्त कार्यक्षेत्रात खालील प्रमाणे प्रतिबंध राहील . सर्व अत्यावश्यक नसलेले सतत प्रक्रीया करणारे उद्योग यांनी या आदेशाचे दिनांकापासून ७२ तासाचे आत आपले आस्थापना सुरक्षितपणे बंद करण्याची प्रक्रीया करावी . शासकीय कार्यालय, कोषागार आणि देय कार्यालयासह लेखा कार्यालये आणि त्यांचेशी संबंधित कामे , या कालावधीत कमीत कमी कर्मचारी संख्येवर चालु राहतील . परंतु तपासणी काऊंटर जवळ कर्मचाऱ्यांमधील अंतर कमीत कमी ३ फुट ठेवणे व सामाजिक अंतर ठेवणे योग्य ती स्वच्छता सुनिश्चित करणे आणि हात धुण्यासाठी सॅनिटायझर व हात धुण्याची सुविधा असणे आवश्यक आहे यांची संबंधित आस्थापना प्रमुखांनी खात्री करावी.
              पुढीलल नमुद अत्यावश्यक वस्तु , सेवा पुरविणारी दुकाने आस्थापना यांना वरील प्रतिबंधातुन वगळण्यात येत आहे . बँक / एटीएम,विमा वित्तीय सेवा आणि संबंधित कामे, नगदी रक्कमेची ने - आण करणारी संस्था, सदर कंपण्यांनी कमीत कमी वेतन पटावर म्युचवल फंड आणि स्टॉक ब्रोकर्स, रेल्वेच्या अत्यावश्यक सेवा, खाद्य पदार्थ विक्री, किराणा सामान, दुध, ब्रेड,फळे, भाज्या, अंडी,मांस, मासे विक्री आणि त्यांची वाहतुक व साठवणूकीची गोदामे,अत्यावशक उत्पादने आणि निर्मिती करणारे साखर कारखाने, डेअरी युनिटस, पशुखाद्य, चारा इत्यादी, दवाखाने , औषधालये , ऑप्टीकल स्टोअर्स, औषध निर्मिती केंद्रे आणि त्याच्याशी संबंधित व्यापारी आस्थापना व वाहतुक करणारी साधने, तसेच प्रतिबंधक लस निर्मिती व वितरण करणारी, सॅनिटायझर,मास्कस, मेडीकल साहीत्य तयार आणि त्यांसंबंधीची वितरण व्यवस्था व संबंधीत सेवा, पाणी पुरवठा सेवा, मान्सुन - पूर्व तातडीची कामे, अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या आस्थापनांनी आपल्या वाहनांनवर व त्यांच्या अधिनस्त कर्मचाऱ्यांच्या वाहनावर सकृतदर्शनी भागावर अत्यावश्यक सेवा विषद करणारे स्टीकर्स लावावेत, कायदा व सुव्यस्था राबविणाऱ्या यंत्रणेला सुस्पष्टपणे दिसतील या पध्दतीने असे स्टिकर्स लावावेत, सर्व संबंधित यंत्रणांनी अत्यावश्यक साधने व सुविधा यांची साठेबाजी व काळाबाजार करणाऱ्यांविरुध्द कठोर कारवाई करावी.
               सदरील आदेशाचे पालन न करणारी कोणतीही व्यक्ती , संस्था अथवा समुह हे रोग प्रतिबंधक कायदा १८९७ व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ आणि भारतीय दंड संहिता १८८ नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व कारवाई करण्यात येईल, वरील आदेशाची अंमलबजावणी करीत असतांना सद्हेतुने केलेल्या कृत्यासाठी कुठल्याही अधिकारी व कर्मचारी यांचेवर विरुध्द कुठल्याही प्रकारची कायदेशिर कारवाई अथवा खटला दाखल करता येणार नाही . तसेच , यापूर्वी या कार्यालयाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश / सुधारीत आदेश / निर्देश / परिपत्रके या आदेशासह अंमलात राहतील. हा आदेश दि.२४ मार्च रोजी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आपल्या सही शिक्यानिशी निर्गमित केला आहे. असे तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी नरेंद्र देशमुख यांनी कळविले आहे.

No comments:

Post a Comment

Pages