येत्या रविवारी देशभरात जनता संचारबंदी ; संचारबंदी चे पालन करावे - पंतप्रधान नरेंद्र मोदी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 20 March 2020

येत्या रविवारी देशभरात जनता संचारबंदी ; संचारबंदी चे पालन करावे - पंतप्रधान नरेंद्र मोदी

येत्या रविवारी देशभरात जनता संचारबंदी ; संचारबंदी चे पालन करावे - पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्लीः येत्या २२ मार्च रोजी म्हणजेच रविवारी सकाळी ७ वाजेपासून रात्री ९ वाजेपर्यंत देशभरात जनता संचारबंदी लागू राहील. देशातील जनतेने या जनता संचारबंदीचे पालन करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केले आहे. ही जनतेने जनतेसाठी लागू केलेली संचारबंदी आहे. त्यासाठी मी प्रत्येक भारतीयाचा पाठिंबा मागत आहे, असे मोदी म्हणाले.

 देशात कोरोना विषाणुचा संसर्ग झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान मोदी यांनी देशाला उद्देशून संदेश दिला. संपूर्ण जग सध्या संकटाच्या एका गंभीर परिस्थितीतून जात आहे. सामान्यपणे एखादे नैसर्गिक संकट येते, तेव्हा ते काही देश किंवा राज्यांपुरतेच मर्यादित राहते. परंतु यावेळी आलेल्या संकटाने संपूर्ण मानवजातीलाच संकटात टाकले आहे. गेल्या दोन महिन्यांत भारतात १३० कोटी नागरिकांनी कोरोनाच्या जागतिक महामारीचा हिमतीने मुकाबला केला आहे. आवश्यक खबरदारी घेतली आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून आम्ही या संकटातून बाहेर पडलो आहोत, सर्व काही ठीक आहे, असे  आपण वागू लागलो आहोत. परंतु निश्चिंत होण्याचा हा विचार योग्य नाही. त्यामुळे प्रत्येक भारतीयाने सजग, सतर्क राहिले पाहिजे, असे मोदी म्हणाले.

 एक नागरिक म्हणून ही जागतिक महामारी रोखण्यासाठी संकल्प आणि संयम आवश्यक आहे. त्यामुळे १३० कोटी देशवासियांनी एक नागरिक म्हणून आम्ही कर्तव्याचे पालन करू, केंद्र सरकार- राज्य सरकारच्या निर्देशांचे पालन करू, असा संकल्प करण्याची गरज आहे. गर्दी आणि घराबाहेर पडण्याचे टाळणे हा संयमही पाळायचा आहे. जेवढे शक्य असेल तेवढे आपण आपले काम घरातूनच करा, असे आवाहनही मोदी यांनी केले आहे.

 सायंकाळी ५ वाजता विशेष आभारः येत्या २२ मार्च रोजी, रविवारी सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत जनतेने जनतेसाठी लागू केलेली संचारबंदी आहे. प्रत्येकाने ती पाळावी. रविवारी सायंकाळी ठिक ५ वाजता आपल्या घराची दारे, बाल्कनी, खिडक्यांसमोर ५ मिनिटेउभे राहून कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या लोकांचे आभार मानू या. देशभरातील प्रशासनाने ५ वाजता सायरन वाजवून लोकांना याबाबत सूचना द्यावी. ही जनता संचारबंदी भारतासाठी एकप्रकारे कसोटीच असेल, असेही मोदी यांनी म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

Pages