अवैध रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टर चालकासह हातापाई करणा-या अन्य एकावर गुन्हा दाखल;वाळू तस्करांच्या दादागिरीला लगाम
किनवट : सहायक जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये अवैध वाळू तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या तहसीलदार यांच्या पथकातील पोलिस व ईतरांसोबत हातापायी व धाकदपटशाही दाखवून ट्रॅक्टर पळवून नेणाऱ्या चालकावर व सोबतच्या दुचाकीवरील व्यक्ती केंद्रे यांचेवर किनवट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बुधवारी ( दि. १८ ) रात्री आठ वाजता शनिवारपेठ ते पार्डी रस्त्यावरील निर्मनुष्य झाडीच्या ठिकाणी ही घटना घडली. कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेत प्रशासन व्यस्त असतांना ही कारवाई केल्यामुळे वाळूतस्कर बिथरले आहेत.
अवैध रेती व गौण खनिज वाहतुकीस प्रतिबंध घालण्यासाठी सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या आदेशान्वये किनवटचे तहसीलदार नरेंद्र देशमुख यांचे अधिनस्त महसूल व पोलिस विभागाचे संयुक्त पथक स्थापन करण्यात आले आहे. त्यानुषंगाने तहसीलदार नरेंद्र देशमुख व त्यांचे पथकातील कर्मचारी पोलिस नाईक सीताराम रानबा खरोडे, पोलीस कॉन्स्टेबल प्रभाकर दत्तात्रय कवडे, खाजगी वाहन चालक मनोज मगरे व महसूलचे इतर दोन कर्मचारी हे खाजगी वाहनाने बुधवारी ( दि. १८ ) रात्री आठ वाजता किनवट पासून दक्षिणेस असलेल्या बारा किलोमीटर अंतरावरील शनिवारपेठ ते पार्डी रोडने जात असताना मदनापूर येथील महादेव मंदिरापासून पार्डीकडे तीन किलोमीटर अंतरावर अवैध वाहतूक करताना रेतीने भरलेला वाहन क्रमांक नसलेला एक ट्रॅक्टर आढळून आला. सदर ट्रॅक्टरचे वाहन चालक यांना स्वामित्व धनाच्या पावतीची विचारणा केली असता त्याच्याकडे कोणतीही वैध पावती आढळून आली नाही. त्यामुळे सदर वाहन उपविभागीय अधिकारी कार्यालय किनवट येथे लावण्यास सांगण्यात आले असता वाहन चालक व सदर ट्रॅक्टर सोबत दुचाकीवरील व्यक्ती केंद्रे यांनी ट्रॅक्टर उपविभागीय अधिकारी कार्यालय, किनवट येथे लावण्यास टाळाटाळ करून पथकातील पोलीस कॉन्स्टेबल प्रभाकर दत्तात्रय कवडे (बक्कल नंबर ६७६, पोस्टे: इस्लापूर ) यांचेशी व पथकातील इतर व्यक्तीशी हातापायी केली व धाकदपटशा दाखवून अंधाराचा फायदा घेऊन सदर अवैधरित्या वाहतूक ट्रॅक्टर पळवून नेले. सदर ट्रॅक्टरचालक, वाहन मालक, दुचाकीस्वार केंद्रे यांचे फोटो व व्हिडिओ काढण्यात आले असून त्यानुसार तहसीलदार यांच्या आदेशावरून सरकारतर्फे फिर्यादी होऊन पोलीस नायक सीताराम रानबा खरोडे यांनी गुरुवारी (दि. १९ ) पहाटे ४.५५ वाजता दिलेल्या प्रथम खबरी वरून सदरील वाहन चालक, मालक, दुचाकीस्वार केंद्रे यांच्यावर भादंवी ३५३, ३७९, १८८, ३४ तसेच इतर योग्य त्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक मारोती थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरिक्षक राहूलकुमार घोळ अधिक तपास करीत आहेत.
No comments:
Post a Comment