माहूर : कोरोना विषाणूंच्या संसर्गाने बाधित होण्याच्या भीतीने व संचारबंदी चे पालन करीत शेतकरी,शेतमजूर घरीच थांबण्याला प्राधान्य देत आहे.अशात वाई बाजार(ता.माहूर) शिवारात भुईमूग,हरभरा,गहू,हळद,मका इत्यादी रब्बी हंगामातील शेतातील उभी पिके वन्य प्राणी उध्वस्त करत असल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
वाई बाजार शिवारातील शेत व शेताला जोडणारे मुख्य रस्ते कोरोना संचारबंदी च्या पार्श्वभूमीवर निर्मनुष्य झाल्याने वन्य प्राण्यांनी आपला मोर्चा रब्बी पिकांकडे वळविला आहे.यात प्रामुख्याने भुईमूग,मका,हरभरा या पिकावर रोही,रान डुकर चे कळप शेत शिवारात घुसून पिकाची नासधूस करत नुकसान करत आहेत.कापसाचे अपेक्षित उत्पन्न झाले नसल्यामुळे शेतकऱ्यांनी पऱ्हाटी काडून रब्बी पिके घेण्यास सुरुवात केली होती.शेतातील विहीरिना मुबलक पाणी असल्याने भुईमूग,गहू,हळद,मका व ज्वारी इत्यादी पिके शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने लावली होती. ज्वारी व मका पिके अवेळी बरसणारे अवकाळी पाऊस, गारपीट व वादळीवाऱ्याने आडवी झाली.तर उरलीसुरली कसर जंगली प्राण्यांच्या उच्छादामुळे पिकांचे नुकसान करून पूर्ण होत आहे.यामुळे रब्बी हंगामातील पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. बी-बियाणे,खते व कीटकनाशके यामध्ये गुंतवणूक केलेल्या रकमेतून छदमाही हाती येणार नसल्याचे चित्र आहे.वनविभागाने वन्य प्राण्यांचा उच्छाद थांबवावा किंवा मग शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
कपाशी पिकावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने कृषी विभागाकडून फरदड कापूस न घेण्याचे आवाहन करण्यात आले होते.त्या भीतीपोटी पऱ्हाटी उपसून दीड एकर रानात भुईमूग लागवड केली होती.पीक परिस्थिती बर्यापैकी असताना रोहि च्या कळपाने शेतामध्ये उच्छाद मांडून निम्म्यापेक्षा अधिक भुईमूग पीक उध्वस्त करून टाकले आहे.तलाठी, मंडळ अधिकारी व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामा करून आर्थिक मदत करावी.
वाई बाजार: शिवारातील अल्पभूधारक शेतकरी द्रोणसिंग प्रल्हाद जाधव यांच्या शेताततील भुईमूग पीक जंगली वन्यप्राण्यांनी अशाप्रकारे उध्वस्त करून टाकले
No comments:
Post a Comment