कायमस्वरुपी विनाअनुदानित शाळा-महाविद्यालयातील शिक्षकांना स्वस्त धान्य दुकानातून धान्य द्या- आमदार रोहित पवार
मुंबईः कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका हातावर पोट असणाऱ्या आणि रोजगाराची कुठलीही हमी नसलेल्या माणसांना बसत आहे. त्यातून कायमस्वरुपी विनाअनुदानित शाळा-महाविद्यालयांतील शिक्षकांनाही बसला असून त्यांना स्वस्त धान्य दुकानातून धान्य किंवा इतर मदत द्या, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत- जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळांबरोबरच खासगी कोचिंग क्लासेसही बंद आहेत. त्यामुळे विनाअनुदानित शिक्षकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या शिक्षकांना तात्पुरत्या स्वरूपात का होईना रेशन दुकानातून धान्य किंवा इतर मदत देण्याबाबत विचार करावा, अशी विनंती रोहित पवार यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
विनाअनुदानित शिक्षकांना आधीच तुटपुंजा पगार दिला जातो. शाळा-महाविद्यालयात नोकरी करून बरेचसे शिक्षक खासगी क्लासेसवरही काम करतात. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे शाळा-महाविद्यालये आणि खासगी क्लासेस दोन्ही बंद असल्यामुळे या शिक्षकांपुढे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्याचे मोठे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे रोहित पवार यांनी केलेली मागणी महत्वाची असून राज्य सरकार त्याबाबत काय निर्णय घेते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
No comments:
Post a Comment