हायड्राॅक्सीक्लोरोक्वीन औषधांचा पुरवठा करा,अन्यथा वाईट परिणाम -राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गर्भित इशारा - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 7 April 2020

हायड्राॅक्सीक्लोरोक्वीन औषधांचा पुरवठा करा,अन्यथा वाईट परिणाम -राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गर्भित इशारा

हायड्राॅक्सीक्लोरोक्वीन औषधांचा पुरवठा करा,अन्यथा वाईट परिणाम -राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गर्भित इशारा



वॉश्गिंटनः कोरोनाच्या संसर्गामुळे बेजार झालेल्या अमेरिकेला भारताकडून कोरोना विषाणुच्या संसर्गावर प्रभावी ठरत असलेले हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन या औषधाचा पुरवठा हवा आहे. राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला पुन्हा एकदा मदतीचे आवाहन करतानाच भारताने या औषधाचा पुरवठा केला नाही तर त्याचे वाईट परिणाम होतील आणि ते भारताला भोगावे लागतील, असा गर्भित इशारा दिला आहे. हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन हे मलेरियाच्या आजारावरील उपचारात वापरले जाणारे औषध असून अमेरिकेत त्याचा वापर कोरोना विषाणुच्या संसर्गावरील उपचारासाठी करण्यात येत आहे.

कोरोनाच्या संसर्गावर प्रभावी ठरत असलेल्या हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन या औषधाचा पुरवठा करण्यास मी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितले आहे. रविवारी माझे त्यांच्याशी बोलणे झाले आहे आणि त्यांनी या औषधाचा पुरवठा करण्याची ग्वाही दिली आहे. जर त्यांनी या औषधाचा पुरवठा केला तर आम्ही त्यांचे कौतुक करू. जर त्यांनी सहकार्य केले नाही तर त्याचे वाईट परिणाम होतील आणि ते झालेही पाहिजे, असे ट्रम्प यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.

विशेष म्हणजे डोनाल्ड ट्रम्प हे भारत दौऱ्यावर आले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यासाठी अहमदाबादेत रोडशो आयोजित केला होता. त्यावेळी मोदींनी ट्रम्प यांची एका तासात तब्बल तीनवेळा गळाभेट घेतली होती आणि  मोदी हे आपले ‘ग्रेट फ्रेंड’ असल्याचे ट्रम्प म्हणाले होते. त्याच ट्रम्प यांनी आता आपल्या या ‘ग्रेट फ्रेंड’ला हा इशारा दिला आहे.

आतापर्यंत अमेरिकेने १.७९ दशलक्ष चाचण्या केल्या आहेत. त्यामुळे अमेरिकेत रूग्णांची संख्या जास्त दिसत आहे. आम्ही मोठ्या प्रमाणावर चाचण्या केल्याचा हा परिणाम आहे. कुणीही एवढ्या मोठ्या प्रमाणावर चाचण्या केल्या नाहीत, असे ट्रम्प यांनी सांगितले.

इटली आणि स्पेननंतर कोरोना विषाणुच्या संसर्गाला बळी पडलेल्या अमेरिकेत तीन लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे तर १० हजाराहून अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत. या विषाणुवर अद्याप कोणताही ठोस उपचार मिळालेला नाही

No comments:

Post a Comment

Pages