( किनवट तालुक्यातील गोकुंदा येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात २८ वर्षाच्या प्रदिर्घ सेवेनंतर शिक्षक महेंद्र नरवाडे ३० एप्रिल ला नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत.. रमेश मुनेश्वर यांनी त्यांच्या कार्याचा दिलेला परिचय.)
किनवट तालुक्यातील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय गोकुंदा येथे ज्यांचे शैक्षणिक सामाजिक व सांस्कृतिक कार्य बहरत गेले. विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी मानून आयुष्यभर सेवा केली. आपल्या विषयात गोडी लागावी म्हणून विविध उपक्रम राबविले. शैक्षणिक संकुलात एक आदराने घ्यावे वाटतं असं नाव.. केवळ शैक्षणिक नव्हे तर सामाजिक क्षेत्रात एक वेगळा ठसा उमटवणारा शिक्षक म्हणजे महेंद्र रामचंद्र नरवाडे.
अशा या ध्येयासक्ती शिक्षकांचा जन्म हदगावतालुक्यातील हारडप येथे ११ एप्रिल १९६२ ला एका सामान्य कुटुंबात झाला. तिथेच प्राथमिक शिक्षण, माध्यमिक चातारी (उमरखेड) येथे झाले. तर बीएससी पदवीचे शिक्षण यशवंत महाविद्यालय नांदेड, बीएड व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाले. त्यांना शिक्षक होऊन सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात सेवा करावी असे फार वाटत होते. प्राचार्य राजाराम वाघमारे यांच्या सहकार्याने मातोश्री कमलताई ठमके यांनी आधार दिला. विज्ञान शिक्षक म्हणून १० जून १९९२ ला रुजू झाले आणि पर्यवेक्षक म्हणून सेवानिवृत्त होत आहेत.संस्था सचिव अभियंता प्रशांत ठमके यांच्या संकल्पनेतून महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय या रोपट्याचे वृक्षात रुपांतर होतांना त्यांनी पाहिले.
आठवी ते दहाव्या वर्गात विज्ञान विषयाचे अध्यापन करताना त्यांनी शाळेत 'विज्ञान मंच', 'विज्ञान छंद मंडळ' स्थापन करून विज्ञान विषयाची विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण केली. तसेच विज्ञान मेळावा, विज्ञान प्रदर्शनात मार्गदर्शन करून तालुका, जिल्हा व राज्य स्तरावर विद्यार्थ्यांना यश मिळवून दिले. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा म्हणून स्वलिखित 'विज्ञान नाटिका' जिल्हा व विभागीय स्तरावर विज्ञान नाट्य महोत्सवात सहभाग घेतला.
व्यवसाय विज्ञ म्हणून शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या बौद्धिक क्षमता व आवड लक्षात घेऊन भविष्यातील वेगवेगळ्या क्षेत्रातील विविध अभ्यासक्रम व सेवा संधी याविषयी शाळेत व गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित विविध व्यवसाय मार्गदर्शन परिषदेत मार्गदर्शन केले. शाळेत सांस्कृतिक विभागामार्फत महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी व राष्ट्रीय सन या प्रसंगी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करुन विद्यार्थ्यांच्या सुप्त कलेला वाव मिळवुन दिला. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त शाळेत आंतरशालेय वक्त्रुत्व स्पर्धेत तयार झालेले विद्यार्थी आज वेगवेगळ्या विचार मंचावर प्रभावीपणे विचार मांडत आहेत.
सामाजिक कार्यातही त्यांचे काम अग्रेसीत आहे. फुले-आंबेडकर स्टडी ग्रुप च्या माध्यमातून प्रथम महाड मुक्ती संग्राम दिनानिमित्त व्याख्यानमाला सह इतरही कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले. भारतीय बौद्ध महासभा तालुका सरचिटणीस म्हणून श्रामणेर शिबिर, धम्म कार्यकर्ता शिबिर, धम्म उपासिका शिबीर, समता सैनिक दल प्रशिक्षण व बौद्धाचार्य प्रशिक्षण घेतले. स्वतः श्रामणेर (बुद्धपाल) प्रशिक्षित होऊन 'बोधाचार्य' म्हणून ते काम करू लागले. किनवट येथे बौद्ध धम्म परिषदेत महत्त्वाचा सहभाग त्यांनी घेतला. क्रांतीसुर्य प्रतिष्ठान च्या दरवर्षी होणाऱ्या सामाजिक जाणिवेचे कवी संमेलन, क्रांतिरत्न पुरस्काराचे वितरण यामध्ये उपाध्यक्ष म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मर्यादित नांदेड चे संचालक म्हणून काम करत असताना छोट्या उद्योग व्यवसायिकांना पतसंस्थेच्या मार्फत अर्थसहाय्य केले.
महेंद्र नरवाडे यांना आज पर्यंत त्यांच्या सेवाकार्यात अनेक पुरस्कार मिळाले आहेत. दलित साहित्य अकादमी दिल्लीचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर फेलॉशिप, पंचायत समिती किनवट चा तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार, सत्यशोधक विचार मंच नांदेडचा उत्कृष्ट साहित्य निर्मिती पुरस्कार, छत्रपती ज्ञानपीठ धुळे चा आदर्श सत्यशोधक केंद्रसंचालक पुरस्कार, तसेच आकाशवाणी नांदेड केंद्रावरून काव्यवाचन, अनेक साहित्य संमेलनात सहभाग, याबरोबरच भीमसंदेश (गीतसंग्रह), सांगावा (कवितासंग्रह), शब्दशिल्प (चारोळीसंग्रह), महासुर्य निळ्या नभाचा (ध्वनिचित्रफीत) आदी पुस्तके प्रकाशित असून अनेक वर्तमानपत्रात कथा, कविता, लेख प्रसिद्ध आहेत. 'एल्गार' 'शब्दक्रांती' व 'समतेची महाकाव्य' या प्रातिनिधिक काव्यसंग्रहात त्यांच्या कविता समाविष्ट आहेत.
आपल्या प्रेमळ स्वभावाने त्यांनी अनेकांना आपलेसे केले आहे. आपल्या शैक्षणिक व सामाजिक चळवळीत एक वेगळा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. त्यांचे हे कार्य इतरांनाही प्रेरणादायी ठरणार आहे. सेवानिवृत्तीनंतरही हे कार्य अखंड चालू राहो ह्या मंगल कामनेसह पुढील आयुष्य त्यांचं सुखासमाधानाचे जावो ह्या शुभेच्छा देतो..!
- रमेश मुनेश्वर,
किनवट, नांदेड- ७५८८४२४७३५
ry.muneshwar@gmail.com
______________________
No comments:
Post a Comment