अतिमागास कोलाम जमातीच्या पन्नास कुटूंबांना अभियंता प्रशांत ठमके यांनी केलं अन्नधान्य वाटप - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 6 April 2020

अतिमागास कोलाम जमातीच्या पन्नास कुटूंबांना अभियंता प्रशांत ठमके यांनी केलं अन्नधान्य वाटप

अतिमागास कोलाम जमातीच्या पन्नास कुटूंबांना अभियंता प्रशांत ठमके यांनी केलं अन्नधान्य वाटप




 किनवट : लॅाकडाऊनमुळे रोजंदारी बुडाली, झोपडीत धान्याचा कणही शिल्लक नाही. अशा उपाशीपोटी अतिदूर्गम भागात राहणाऱ्या अतिमागास कोलाम जमातीच्या पन्नास कुटूंबांना तेल, साबून,मीठापासून सर्व काही नित्याच्या वस्तू,पंधरा दिवस पुरेल एवढं अन्नधान्य अभियंता प्रशांत ठमके यांनी वाटप केलं आहे. खऱ्या गरजूंना मदत पोहचविल्याबद्दल सर्वत्र त्यांचं कौतुक होत आहे.
            कोरोना ( कोव्हीड- 19 ) प्रतिबंधासाठी केलेल्या लॉक डाऊनमुळे सारं काही ठप्प झालं आहे. हातावर पोट असणारांचे हाल होत आहेत. जंगलातील बांबू पासून दुरड्या, टोपले, सुपं इत्यादी वस्तू तयार करून बाजारात विकायच्या. मिळालेल्या पैशातून अन्नधान्य विकत आणायचं, मग चुल पेटवायची. असं करणारी आदिवासी मधील अतिमागास कोलाम जमात आहे. लॉकडाऊनमुळे बाजार बंद, काम बंद, अत्यंत स्वाभीमानी तितकीच प्रेमळ असणारी ही मंडळी. त्यांनी कुणापुढेही हात न पसरता दाराला ताटी लावून स्वतःला कोंडून घेतलं. खरंखुरं लॉकडाऊन करून त्यांनी स्वतःला ' होमकोरोंटाईन ' करवून घेतलं.
            त्यांची उपासमार होत असल्याची खबर लागताच. अनेक सामाजिक कार्यक्रमात अन्नदान करणारे मातोश्री कमलताई ठमके बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके यांनी समाजऋण फेडण्याच्या उद्देशाने त्यांना दैनंदिन गरजेच्या वस्तू पुरवायचं ठरवलं. प्रत्येकी एक किलो मुगदाळ, मसूरदाळ, गूळ, खाद्यतेल, मीठ, पाच किलो तांदूळ, चहापत्ती, हळद, मिरची पावडर, अंगाचा व कपड्यांचा साबूण अशा अन्नधान्य साहित्याची किट घरीच तयार केली. याकामी त्यांच्या अर्धांगिणी प्राचार्या शुभांगी ठमके यांनी मोलाचं सहकार्य केलं. तालुका मुख्यालयापासून तीस किमी अंतरावर असलेल्या कोलामगुडा, लिंबगुडा व सिडामखेड्याजवळील कोलामपोड येथे चिरंजीव सुशांत ठमके यांना सोबत घेऊन पन्नास कुटूंबियांना पंधरा दिवस पुरेल एवढं अन्नधान्य वाटप केलं.
            याप्रसंगी उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार नाईक यांनी कोरोनाच्या अनुषंगाने घ्यावयाच्या काळजीबद्दल जनजागृती संदेश दिला. उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी गोवर्धन मुंडे, प्रकाश टारपे, तुकाराम पेंदोर, अनिरूध्द केंद्रे, पत्रकार गोकुळ भवरे, साजीद बडगुजर, रवि भालेराव, महाजन नागोराव आत्राम उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages